कामगार हित जोपासण्यासाठी काम करेन

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची कामगार स्नेह मेळाव्यात ग्वाही

शिरोळ: सलीम माणगावे 
दि .१० : अत्यंत अडचणी असूनही श्री दत्तचे कामगार जीवाचे रान करून कारखाना चांगल्या रीतीने चालविण्यामध्ये मोलाची भूमिका घेत आहेत. सहकार चळवळ टिकविण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचे जीवन फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. आगामी काळात कामगारांच्या सदैव सोबत राहून कामगार हित जोपासण्यासाठी काम करेन, अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

श्री दत्त साखर कारखाना द्वारा शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर आयोजित आजी माजी कामगार स्नेह मेळावा व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली असून सर्वांच्या सहकार्याने जो निर्णय होईल, त्याप्रमाणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त कारखाना अध्यक्ष रघुनाथ पाटील हे होते.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, स्व. सा. रे. पाटील यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धाडसी निर्णय घेतले होते. त्याच पद्धतीने कामगार हितासाठी गणपतराव पाटील यांचे कार्य सुरू आहे. कारखाना सेवेत निवृत्त झाल्यानंतर कोणीही बोलावत नाही, मात्र आजी माजी कामगारांचा सस्नेह मेळावा घेवून कामगारांच्या हिताचा निर्णय आणि विचार घेतला जातो, ही कामगारांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्याध्यक्ष राऊसो पाटील म्हणाले, साखर कारखाना कामगारांच्यासाठी नव्याने समिती गठीत होणार आहे. या समितीमध्ये गणपतराव पाटील यांनी नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून साखर कारखानदारीला वैभव प्राप्त होणार आहे. गणपतराव पाटील यांनी शिरोळ विधानसभा लढवावी, सर्व कामगार पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. कारखाना कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कोल्हापूर जिल्हा साखर कामगार समन्वय समिती अध्यक्ष अविनाश पाटील, धोंडीराम दबडे, दत्तात्रय कोरे, चंद्रशेखर कलगी आदिंनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सहकार महर्षी, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. युवा व्याख्याते वसंतराव हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक श्री दत्त साखर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी करून कारखाना आणि कामगारांच्या प्रगतीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन महेश घोटणे यांनी केले तर आभार रावसाहेब भोसले यांनी मानले. यावेळी व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ सचिव संजय मोरबाळे, कारखाना सर्व संचालक, संचालिका, अधिकारी वर्ग, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×