गणपती विसर्जनासाठी १२ व १७ सप्टेंबर रोजी मांडवी व भाट्ये किनाऱ्याकडे इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद
रत्नागिरी, दि. 11
गौरी गणपती विसर्जन (१२ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन (१७ सप्टेंबर) निमित्त, मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गणपती मूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनांशिवाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 115 व 116 नुसार दिले आहेत.
या आदेशानुसार, भुते नाका ते मांडवी समुद्र किनारा दरम्यान आणि भाट्ये बस स्टॉप ते भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर, विसर्जनासाठी जाणाऱ्या मूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तसेच, विसर्जन मिरवणुकीतील वाद्यांचे वाहन वगळता कोणत्याही अन्य वाहनांना या मार्गावर प्रवेश मिळणार नाही.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. वाहतूक नियमनाच्या दृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 116 नुसार वाहतुकीची चिन्हे उभारण्याची जबाबदारी पोलीस विभागाने घेण्याचे आदेश दिले आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.