पूर्व युरोप मधील अझरबैजान या देशाला गोकुळचे देशी लोणी निर्यात..
गोकुळची दुग्ध उत्पादने थेट निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील:अरुण डोंगळे
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.०३: कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे गाय दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार असून गोकुळने केलेली हि पहिलीच थेट निर्यात आहे. आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ४२ मे. टनाचे वातानुकूलित कंटेनर अझरबैजान देशाला पाठविण्यात आले. या गाडीचे पुजन व निर्यात शुभारंभ संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प येथे करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ ब्रॅण्डची उत्पादने नेहमीच गुणवत्तापूर्ण असल्याने गोकुळला मानाचे स्थान निर्माण झाले आहे. संघामार्फत वेगवेगळे दुग्ध पदार्थ मार्केटमध्ये विक्री केले जातात, दुग्ध पदार्थांची विक्री वाढवण्याच्या दृष्टीने व अतिरिक्त गाय दुधाची निर्गत होणेसाठी गाय दुधाचे पदार्थ निर्यात करणे बाबत संघामार्फत प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून अझरबैजान या देशांमधील मे. अटेना डेअरी यांनी संघाचे गाय देशी लोणी (बटर) खरेदी केली असून आज दि.०३/१०/२०२४ इ.रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ४२ मे. टनाचे कंटेनर पाठवण्यात आले. याचबरोबर नजीकच्या काळामध्ये मे. अटेना ग्रूप यांनी संघाकडून आणखी लोणी, दूध भुकटी व तूप खरेदी करण्यामध्ये स्वारस्य दाखवले असून त्यांना संघाचे दुग्ध पदार्थ निर्यात करण्यात येतील व भविष्यात इतर देशांना हि गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे सांगितले.
पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघ गोकुळकडून गाय तूप, लोणी आणि दूध भुकटी यांची आयात करून ते रशिया, अझरबैजान, कजाकिस्तान, इराण सह अशा वीस देशांमध्ये विक्री करणार आहेत. यामुळे गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया व युरोपातील देशामध्ये उपलब्ध होणार आहेत. याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान असून याचे सर्व श्रेय संघाचे संचालक मंडळ, लाखो दूध उत्पादक, हितचिंतक व संघाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना जाते. या निर्यातीसाठी संघाचे मार्केटींग अधिकारी यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतल्या बद्दल यावेळी त्यांचे कौतुक केले.
यावेळी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.