क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले,सावित्रीमाईंनी ‘भारतरत्न’ द्या

डॉ.हुलगेश चलवादी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र लिहणार

पुणे:प्रतिनिधी 

दिनांक ४ जानेवारी :स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ द्या,अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज, शनिवारी (ता.४) केली. महान ज्योतीराव आणि सावित्रीमाईंना भारतरत्न दिल्यानंतर या पुरस्काराचा मान आणखी उंचावेल, अशा शब्दात त्यांनी सावित्रीमाई फुले यांना आदरांजली वाहिली.
फुले दांपत्याने भारतीय समाजाला समतेचा मूलमंत्र दिला. शिक्षण, महिला सबलीकरण, जातीय भेदभाव निर्मूलन आणि सामाजिक सुधारणा यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. अशा थोर व्यक्तिमत्त्वांना आजही योग्य तो सन्मान दिला गेला नसल्याची खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ.चलवादी यांनी केंद्र सरकारला या विषयावर तत्काळ निर्णय घेण्याची विनंती करीत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठवणार असल्याचे देखील स्पष्ट केले. फुले दांपत्याला भारतरत्न दिल्यास त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल,असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
क्रांतीकारी विचारवंत, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांनी समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा केली. फुले दाम्पत्याने बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला.स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली, अशी भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.
राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखली पाहिजेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. समाजासाठी खूप मोठं काम करणाऱ्या फुले दाम्पत्याला अद्यापही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×