कोल्हापूर जिल्ह्यात गतीमान प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याचे पालकमंत्री आबिटकर यांचे निर्देश

नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि योजना वेळेत देण्यासाठी सदैव तत्पर रहा :पालकमंत्री आबिटकर

कोल्हापूर:प्रतिनिधी 

 दि. १४ फेब्रुवारी – नागरिकांना वेळेत सेवा पुरवणे, दाखल्यांचे वितरण निश्चित मुदतीत करणे, तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रशासनाने कामकाज गतीमान करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

गतीमान प्रशासनाची संकल्पना – जिल्ह्यात नवा आदर्श प्रस्थापित करा

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, “जिल्ह्यातील प्रशासनाने गतीमान कामकाजाचा नवा आदर्श प्रस्थापित करावा. केवळ नियमित कामे न करता प्रत्येक अधिकाऱ्याने दररोज दोन विशेष कामे करावी, जेणेकरून शासनाच्या योजनांचा अधिक परिणामकारक लाभ नागरिकांना मिळेल.”  त्यांनी दिव्यांगांसाठी रेशनकार्ड वितरण, ई-फेरफार नोंदी, धान्य वितरणातील पारदर्शकता, स्वामित्व योजना, सेवा हमी अधिनियमाची अंमलबजावणी, भूसंपादन व रोजगार हमी योजना यांसारख्या महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. आयुष्यमान भारत कार्ड वितरणास प्राधान्य देण्यासाठी तालुका स्तरावर कार्यवाही करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

धान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याचे आदेश

जिल्हा पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत, अन्नधान्य वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व प्रभावी करण्यासंबंधी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. गरजू नागरिकांना योग्य पद्धतीने धान्य मिळावे यासाठी मार्गदर्शक सूचना व प्रक्रिया पद्धती ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  ते म्हणाले, “रेशनकार्ड काढण्यासाठी जर कोणी अनधिकृत शुल्क घेत असेल, तर अशांवर कठोर कारवाई करून त्यांना कामावरून हटवा.” तसेच दिव्यांगांसाठी विशेष रेशनकार्ड मोहीम राबवून त्यांना त्वरित लाभ देण्याच्या सूचना पुरवठा विभागाला त्यांनी दिल्या. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील धान्य वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्याचेही निर्देश दिले.

गावठाणाबाहेरील मिळकतधारकांसाठी ‘प्रॉपर्टी कार्ड’ योजना

सध्या गावठाण हद्दीतील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना सुरू आहे. मात्र, गावठाणाबाहेरील मिळकतधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी जाहीर केला.ते म्हणाले, “गावठाणाबाहेरील रहिवासी व जमीनधारकांना विकासकामे व व्यवसायासाठी कर्ज मिळण्यास अडचणी येतात. त्यांच्या जमिनींच्या नोंदी अद्ययावत नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात १०० गावांची निवड करून ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवावी.”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×