औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

सांगली: प्रतिनिधी 

दि .२० :  सांगली जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त (औषधे) रा. सु. करंडे यांनी केले आहे. तसेच, सांगली जिल्हा नशामुक्त अभियानात सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एनकॉर्ड समितीच्या बैठकीत, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेसोबत बैठक घेऊन औषध दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासंबंधी तसेच नशेच्या औषधांविषयी प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

बैठकीत अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयातील प्रभारी सहायक आयुक्त (औषधे) रा. सु. करंडे आणि श्रीमती ज. प. सवदत्ती यांनी मार्गदर्शन केले. सांगली जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर औषध विक्रेते यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा

औषध विक्रेत्यांनी नशेच्या औषधांच्या खरेदी-विक्रीचा लेखाजोखा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर औषध विक्री दुकानांमध्ये नशेच्या औषधांची अवैध विक्री होत असल्याचे आढळले, तर संबंधित दुकानावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच परवाना रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही बसवण्याची आणि नशामुक्त अभियानाला सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×