शिवाजीनगर पोलीस ठाण्यास ‘राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे’चा बहुमान

कोल्हापूरविजय मकोटे 

दि.४ :शिवाजीनगर पोलीस ठाण्याने 2022 मध्ये राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे’ हा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना सन्मानचिन्ह आणि सशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिवाजीनगर पोलीस ठाणे कोल्हापूर परिक्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील एक संवेदनशील ठाणे म्हणून ओळखले जाते. 2021 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे (सध्या अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर) यांनी महादेव वाघमोडे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर दिला. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण, गुन्ह्यांचा वेगवान तपास, न्यायालयीन कामकाजात प्रभावी पाठपुरावा, तसेच लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने ठाण्याच्या कामगिरीची राज्यभर चर्चा झाली.

धार्मिक व जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने ठाण्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी पोलीस महासंचालक कार्यालयास प्रस्ताव सादर केला. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याला महाराष्ट्रातील ‘सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे’ म्हणून गौरविण्यात आले.

या यशाबद्दल महादेव वाघमोडे यांनी सर्व सहकारी अधिकारी व अंमलदारांचे आभार मानत, हे यश संघटनात्मक कार्यसंस्कृतीचे फलित असल्याचे नमूद केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!