इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचा अर्थसंकल्पाला पाठिंबा : वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १०: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाचे दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन ने स्वागत केले असून, वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.
या अर्थसंकल्पात महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे टेक्निकल टेक्सटाईल क्षेत्राला चालना मिळणार असून, संशोधन, उत्पादन आणि वापरासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे एकरी कापूस उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि चांगल्या प्रतीच्या कापसाच्या उत्पादनालाही प्रोत्साहन मिळेल.
याशिवाय, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) नवीन धोरण लवकरच जाहीर होणार असल्याचेही अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना मोठा फायदा होईल. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी वस्त्रोद्योग विभागासाठी ७७४ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्रस्तावित केला आहे.
यंत्रमाग उद्योगासाठी दिली जाणारी वीज सवलत पुढेही सुरू राहणार असल्याची महत्त्वाची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. महावितरण कंपन्यांना यासाठी अतिरिक्त निधी दिल्यामुळे यंत्रमाग धारकांना याचा लाभ मिळणार आहे.
उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी बँकिंग व्यवहार, विशेषतः नेट बँकिंग सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई येथे सायबर गुन्हे प्रतिबंध विभाग आणि अत्याधुनिक सायबर लॅब सुरू केली जाणार आहे. यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची सुरक्षितता वाढेल आणि त्यांच्या मनातील भीती दूर होईल.
या संपूर्ण निर्णयांचे स्वागत करत दि इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “हा अर्थसंकल्प वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आशादायक असून, उद्योगाच्या प्रगतीला चालना देणारा आहे,” असे मत व्यक्त केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.