कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे यांची निवड

कोल्हापूर;

दि. 2: राज्य शासनाने प्रसारमाध्यम प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी विभागीय अधिस्वीकृती समित्या स्थापन केल्या असून, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर सुधाकर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. सुखदेव गिरी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी श्री. देशपांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीचे सदस्य श्री. सुखदेव गिरी, गजानन नाईक, निखील पंडीतराव आणि प्रताप नाईक यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्य अधिस्वीकृती समितीकडे केली होती. त्यास मान्यता देत राज्य समितीने श्री. समीर देशपांडे यांच्या अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा केली.कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समिती अंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांना अधिस्वीकृतीपत्रिका देण्याचे काम करण्यात येणार आहे.

29 वर्षांचा पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव

समीर देशपांडे हे गेल्या २९ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून, त्यांनी दैनिक तरुण भारत, दैनिक दिव्य मराठीसह विविध माध्यमांमध्ये योगदान दिले आहे. सध्या ते लोकमतमध्ये वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर प्रेस क्लबकडून त्यांना दोन वेळा उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, राज्य शासनाने त्यांना महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरवले आहे. याशिवाय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर आणि सार्वजनिक वाचनालय बेळगावसह अनेक संस्थांनीही त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.‘प्रतिभावंतांचे आजरे’ आणि ‘गाथा ग्रामविकासाची’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांनी ग्रामीण आणि सामाजिक विषयांवर महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.श्री. समीर देशपांडे यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतर कोल्हापूर विभागातील प्रसारमाध्यमांना अधिक सुसूत्र आणि प्रभावी अधिस्वीकृती प्रक्रिया मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×