कोंबडी बाजारात दुर्गंधीचा कहर, महापालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप

कोल्हापूर :प्रतिनिधी 

दि. 13 मे.दुर्गंधीचा विळखा: कोंबडी बाजारातील नागरिकांच्या आरोग्याला धोका, महापालिकेच्या भोंगळ कारभाराने निर्माण केली गंभीर स्थिती

कोल्हापूर – लक्ष्मीपुरी येथील कोंबडी बाजार परिसरात महापालिकेच्या भोंगळ  कारभारामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील ड्रेनेज लाईनमधून सतत दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या परिसरात दरवळणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक व्यापारी वर्ग आणि रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रारींचा भडिमार केला असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही. सात वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे.

“महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आमचा दैनंदिन व्यवहार अडचणीत आला आहे. ग्राहक येण्याचे टाळत आहेत. आरोग्याचा प्रश्न तर दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे,” असे संतप्त व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागरिक आणि व्यापाऱ्यांची एकच मागणी आहे की, कोंबडी बाजारातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न महापालिकेने तातडीने सोडवावा, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य, व्यापाऱ्यांचे व्यवसाय आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता धोक्यात आली आहे. आता तरी प्रशासन जागे होईल का, हा प्रश्न कोल्हापूरकरांना सतावत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!