कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत

आमदार राहुल आवाडे

इचलकरंजी :
कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत होते. तसेच पाण्यामध्ये ठिबक सिंचनपेक्षा 30 टक्के जादा बचत होते. या अधुनिक प्रणालीचा तळंदगे पाणी पुरवठा संस्थेच्या संपूर्ण 420 एकर क्षेत्रावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा मानस आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला.
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना व जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्था तळंदगे यांचे संयुक्त विद्यमाने तळंदगे येथे ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणेसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करणेत आले होते. त्यामध्ये अध्यक्षीय स्थानावरुन आमदार आवाडे बोलत होते.
ते म्हणाले, तळंदगे येथील जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्था ही आदर्श व पथदर्शक संस्था म्हणून उदयास येण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. एआय प्रणाली बाबतचे ज्ञान अवगत करून घेण्यासाठी पाणी पुरवठा संस्थेच्या सर्व 365 सभासदांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे प्रशिक्षणासाठी पाठविणेत येईल व त्याचे सर्व नियोजन कारखान्यामार्फत करणेत येईल. एआय कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी येणारा प्रती हेक्टरी खर्च 25 हजार इतका असुन त्यापैकी 50 टक्के रक्कम कारखान्याकडून अनुदान स्वरूपात देवून उर्वरीत रक्कम पुढील दोन वर्षात प्रतीवर्षी 25 टक्के प्रमाणे येणार्‍या ऊस बिलातुन घेतली जाईल व योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी केली जाईल. एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारा व त्यासाठी अनुदान देणारा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना हा महाराष्ट्रातील पहिला कारखाना असुन शेतकर्‍यांचे उत्पादन वाढुन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हा एकच उद्देश असलेचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
स्वागत पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन सुरेश भोजकर यांनी केले. प्रस्तावना जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे यांनी तर सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे, संचालक आण्णासो गोटखिंडे, सुरज बेडगे, प्रकाश पाटील, माजी संचालक धनंजय मगदुम तसेच पाणी पुरवठा संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!