विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना भात लागवडीबाबत मार्गदर्शन
लांजा:प्रतिनिधी
दि .२ :विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, देवधे-लांजा (रत्नागिरी), रिलायन्स फाउंडेशन, कृषी विभाग, आत्मा आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 मे रोजी पूनस, वीरगाव व देवधे या गावांमध्ये खरीप हंगामातील भात लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. महेश महाले यांनी ‘विकसित भारत संकल्प अभियान’ याचे महत्त्व सांगत भात बिजप्रक्रिया, सुधारीत लागवड तंत्र आणि संतुलित खत वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेल्या रत्नागिरी ६ व रत्नागिरी ८ या भात वाणांची माहिती देण्यात आली. डॉ. वैभव येवले यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध अॅप्सची माहिती दिली.
शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी ६ या वाणाचे बियाणे वितरित करण्यात आले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थान, मुंबई येथील डॉ. अंकुश कांबळे यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले तर डॉ. सौरव कुमार यांनी मत्स्य संपदा योजनेबाबत माहिती दिली.
लांजा तालुका कृषी अधिकारी श्री. अभिजीत शेलार यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. आत्मा संस्थेच्या श्रीमती गौरी शेरे यांनी सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राजेश कांबळे यांनी पूनस व वीरगाव येथे ऑनलाईन भात शेतीशाळा उपक्रमाबाबत माहिती दिली.
पूनस गावाचे सरपंच श्री. संतोष लिंगायत यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी सहाय्यक श्री. विजय शेट्ये, श्री. निवृत्ती तायडे, पूनस गावचे प्रगतशील शेतकरी श्री. अविनाश धुमाळ, वीरगाव महिला बचत गटाच्या रिद्धी मौर्य व दर्शना आग्रे, तसेच रिलायन्स फाउंडेशनचे श्री. गौरव जाधव यांची उपस्थिती होती. वीरगाव आणि पूनस येथील शेतकरी बांधव आणि महिलांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.