मद्यपान व धुम्रपानापासून दूर राहून प्रोस्टेट आरोग्य टिकवा :डॉ. मकरंद खोचीकर

इचलकरंजी :विजय धुत्रे 
दि.२५: नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी दिला. सर्वच पुरुषांनी वयाच्या पन्नाशीनंतर दरवर्षी प्रोस्टेट तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या वतीने फादर्स डे निमित्त प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांचे प्रोस्टेट या विषयावर माहितीपूर्ण व जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रोस्टेट आजारांबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर निदान व उपचाराची आवश्यकता अधोरेखित करणे हा सेमिनारचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड यांनी केले.
डॉ. खोचीकर यांनी प्रोस्टेट ग्रंथीची रचना आणि कार्य याविषयी माहिती देत प्रोस्टेट ग्रंथीच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या बाबी अतिशय सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने समजावून सांगितल्या. ते म्हणाले, वय जसजसे वाढते, तसतसे या ग्रंथीचा आकार वाढू शकतो. त्यामुळे लघवी करताना त्रास होणे, वारंवार लघवी लागणे, लघवीची धार कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी नियमित तपासणीसह वेळीच औषधोपचार घ्यावा, असे सांगितले. त्यांनी प्रोस्टेटायटिस (ग्रंथीमध्ये सूज/संसर्ग) आणि प्रोस्टेट कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांवर सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ व मान्यवरांची उपस्थिती होती. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. एस. पी. मर्दा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटना अध्यक्ष विनीत तोष्णीवाल, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी समेचे अध्यक्ष नितीन धूत, श्री महेश सेवा समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश सारडा, इचलकरंजी तहसील माहेश्वरी समा अध्यक्ष रामगोपाल मालानी, श्री महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड यांची उपस्थिती होती. या प्रकल्पाचे नेतृत्व माहेश्वरी युवा संघटना उपाध्यक्ष विनय बालदी यांनी पार पाडले. संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी याकामी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन युवा संघटना सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×