इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील २५ वॉर्डमध्ये ‘ब्लॅक स्पॉट ब्युटीफिकेशन’ उपक्रम
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२५ :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार आज मंगळवार, दिनांक २४ जून रोजी शहरातील सर्व २५ वॉर्डमध्ये ‘ब्लॅक स्पॉट ब्युटीफिकेशन’ (Black Spot Beautification) हा उपक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आला.
उपायुक्त अशोक कुंभार आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक, संबंधित वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांनी आपापल्या वॉर्डमध्ये सौंदर्यीकरणाचे काम केले. या उपक्रमांतर्गत काही ठिकाणी टायरमधून वृक्षारोपण, सिमेंट पाईप, लाकूड, लोखंडी भंगार, रंगीबेरंगी रांगोळी आदींच्या साहाय्याने अनोख्या कलाकृती तयार करण्यात आल्या.
प्रमुख ठिकाणांवरील सौंदर्यीकरण:
गेस्ट हाउस शेजारी (वॉर्ड १, २, ४) – बाकडे
ब्रह्मकुमारी चौक (वॉर्ड ६) – टायर झुंबर
विवेकानंद कॉलनी (वॉर्ड १७) – टायर पासून बाकडे
विराट हनुमान मंदिर (वॉर्ड १९) – सेल्फी पॉईंट
जुने पोलीस स्टेशन (वॉर्ड १६) – भंगारातून कलाकृती
चेतना पतसंस्था जवळ (वॉर्ड २५) – टायर पासून मोटरसायकल
शहापूर रोड RTO समोर (वॉर्ड २४) – टायर फ्लॉवर पॉट
चौंडेश्वरी कॉलनी (वॉर्ड २३) – रांगोळी कलाकृती
इतर वॉर्डांमध्येही कुंड्या, टायर, पाईप आदींपासून सौंदर्यीकरण
या उपक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यासमवेत काही वॉर्डांना भेट दिली. त्यांनी परिसरातील सौंदर्यीकरणाची पाहणी करत सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या खांद्यावर शाबासकीची थाप देत प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. परिसरातील नागरिकांनी देखील या उपक्रमाचे भरभरून स्वागत व कौतुक करत महानगरपालिकेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.