इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींकरिता आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न

  • इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि .२५:  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या (सामाजिक न्याय दिन) निमित्ताने दिव्यांग नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दिनांक २५ जून रोजी अलायन्स हॉस्पिटल येथे हे शिबिर इचलकरंजी महानगरपालिका, अलायन्स हॉस्पिटल आणि इचलकरंजी केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.

या शिबिराचा उद्घाटन समारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, अलायन्स हॉस्पिटलचे डॉ. समुवेल भंडारे, आयेशा राऊत, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी शहाजी राणे, शितल कांबळे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात शहर व परिसरातील सुमारे ६० दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेतला. त्यांच्यासाठी विविध आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आणि समाज विकास अधिकारी सुनील शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करत शनिवार, दिनांक २८ व रविवार, दिनांक २९ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत दिव्यांग नोंदणीसाठी अर्ज दाखल करून घेण्याचे कामकाज महानगरपालिकेकडून राबविण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक समावेशकतेचा आणि दिव्यांगांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून नागरिकांतून याचे कौतुक होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×