महापालिका वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न

इचलकरंजी, :अन्वर मुल्ला 

दि.२९ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आज भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेला अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शोभायात्रेचा शुभारंभ महापालिका मुख्य कार्यालयातून आयुक्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवतीर्थ, महात्मा गांधी चौक, राजवाडा चौक, रसना कॉर्नर, नाट्यगृह चौक, चांदणी चौक, छत्रपती संभाजी चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा या मुख्य मार्गावरून पुन्हा महापालिका कार्यालयात परत आली.

महानगरपालिकेच्या विविध विभागांनी सादर केलेली सजावटीची वाहने आणि फलक प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. यामध्ये पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य विभागाच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक, नगररचना विभागाच्या मुलींनी सादर केलेला कथक नृत्यविष्कार, लेखा विभागातील छत्रपती शाहू महाराजांची झांकी, ग्रंथालय विभागाचे ‘शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील फलक आकर्षण ठरले. शहरातील अल्फोंसा स्कूलचे विद्यार्थी बँड पथकासह तर सचिन नाईक स्केटिंग अकॅडमीचे विद्यार्थी स्केटिंगवरून सहभागी झाले.शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, संत गाडगेबाबा, वासुदेव यांच्या वेशभूषेतील अधिकारी-कर्मचारी लक्ष वेधत होते. काही विभागांनी हालगी वाद्य वाजवून वातावरणात ऊर्जा निर्माण केली. पुरुष अधिकारी-कर्मचारी पारंपरिक कुर्ता-पायजमा व फेट्यात तर महिला नऊवारी साडी व फेट्यात सजून शोभायात्रेत सहभागी झाल्या.शहरातील नागरिकांनी या देखाव्यांचे कौतुक करत वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या उपक्रमांचे स्वागत केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×