महापालिका वर्धापन दिनानिमित्त बासरी–सारंगी जुगलबंदी आणि सायली होगाडे यांच्या नृत्याने श्रोते मंत्रमुग्ध
इचलकरंजी, :अन्वर मुल्ला
दि.२८ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त जून महिन्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी बासरी-सारंगी जुगलबंदी आणि नृत्य सादरीकरणाने रसिकांना अविस्मरणीय अनुभव मिळाला.श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रारंभी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी प्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार आणि सारंगीवादक उस्ताद साबीर खान यांनी तबलावादक उस्ताद समीर सूर्यवंशी
यांच्या साथीनं विविध रागांची जुगलबंदी सादर केली. त्यांच्या सुरेल वादनाने सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाच्या समाप्तीला ‘रघुपती राघव राजाराम’ या भक्तिगीताच्या सादरीकरणाने रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यानंतर नृत्यांगना सायली होगाडे यांच्या पदन्यास नृत्य कला अकादमीच्या ३० सहकाऱ्यांनी बॉलीवूड थीमवर आधारित हिंदी, मराठी व इतर भाषेतील गीतांवर शास्त्रीय नृत्य सादर केले. विशेषत: “आधा है चंद्रमा रात आधी” या गीतावरील नृत्य सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली.
या सांस्कृतिक सोहळ्याला उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, महिला व बालकल्याण अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.