अमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याची कारवाई
रत्नागिरी: नियाझ खान
दि .२८ जून : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार हे पथक तयार करण्यात आले होते.अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की पोफळी टी.आर.टी., धनगरवाडी, ता. चिपळूण येथे एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे दिनांक २७ जून रोजी रात्री ९ वाजता पथक तयार करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. गव्हाणे, पोहेकॉ. यादव, पोकॉ. जगदाळे, पोकॉ. फडतरे, पोकॉ. माने, एस.एम. लोटे, पोहेकॉ. शेख, मपोकॉ. मुल्ला तसेच दोन पंच अशा कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी टी.आर.टी., धनगरवाडी, ता. चिपळूण) या इसमाच्या ताब्यातून ५८८ ग्रॅम वजनाचा, सुमारे ₹१४,०००/- किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला व तो ताब्यात घेण्यात आला.
याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४६/२०२५, गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये दि. २८ जून रोजी पहाटे ३.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या बजावली.
रत्नागिरी पोलीस दलामार्फत अमली पदार्थविरोधी मोहीम सुरुच राहणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.