श्री आदिनाथ बँकेची वार्षिक सभा उत्साहात पार, ८% डिव्हीडंड जाहीर

इचलकरंजी : विजय धुत्रे 
दि.६: येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. इचलकरंजीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, ६ जुलै २०२५ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा होते. प्रारंभी आदिनाथ भगवान व संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेस प्रमुख अतिथी म्हणून सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), माजी मंत्री प्रकाश आवाडे (आण्णा), आमदार डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती लाभली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार उपाध्ये यांनी वार्षिक अहवाल वाचला. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. अध्यक्षीय भाषणात चेअरमन काडाप्पा यांनी ८% डिव्हीडंड जाहीर केला. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत १ हजार रुपयांच्या शेअर्सवर २४४० रुपयांचा डिव्हीडंड परतावा मिळाला आहे. अहवाल वर्षात बँकेला १ कोटी ७९ लाख रुपये ढोबळ नफा व ७७ लाख ७० हजार निव्वळ नफा झाला आहे.

कर्जदारांनी कर्ज खात्यात नियमितता ठेवावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १३५ सभासदांना १८ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

प्रमुख मार्गदर्शन करताना प्रकाश आवाडे यांनी बँकेच्या प्रगतीचा गौरव केला. सायबर सुरक्षा, तांत्रिक नवकल्पना व कार्यक्षम बँकिंगची गरज अधोरेखित केली. महिलांसाठी नव्या योजना राबविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

सभेमध्ये अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), प्रकाश आवाडे (आण्णा), डॉ. राहुल आवाडे, नूतन व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम, नूतन चेअरमन नवमहाराष्ट्र सुत गिरणीचे अभयकुमार मगदूम, तसेच इतर नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव झाला. आदर्श ग्राहक म्हणून श्री. बाळासाहेब गोपाळ बोंद्रे, उत्तम सेवा बजावणारे श्री. जिवंधर चौगुले तसेच आदर्श कर्मचारी व उत्कृष्ठ शाखांचा सन्मान करण्यात आला. शाखा माणगावला रु. ११,०००/- व शिल्ड देण्यात आली.सभेचे सूत्रसंचालन तिर्थकर माणगांवे यांनी केले. व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×