गडहिंग्लज येथे सहा पोलीस उपनिरीक्षक रंगेहात लाच घेताना अटक
गडहिंग्लज : (प्रतिनिधी)
अपघात प्रकरणातील जप्त वाहन सोडण्यासाठी ६०,००० रुपये लाचेची मागणी करून त्यातील ४०,००० रुपये लाच स्वीकारणाऱ्या सहा पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका ४९ वर्षीय तक्रारदाराच्या मुलाविरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात तक्रारदाराचे वाहन जप्त करण्यात आले होते. वाहन सोडण्याच्या तसेच गुन्ह्याच्या कागदपत्रांत सुलभता करण्याच्या मोबदल्यात आरोपी निता शिवाजी कांबळे (सहा पोलीस उपनिरीक्षक) यांनी६०,००० रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने या संदर्भात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी पुढील कारवाईसाठी कोल्हापूर युनिटला निर्देश दिले.दिनांक ५ जुलै २०२५ रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता आरोपीने तडजोडीनंतर ४०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या आवारात पंचासमक्ष ही लाच रक्कम स्वीकारताना आरोपीला रंगेहात अटक केली.
आरोपीकडून लाच रक्कम४०,००० रुपये आणि व्हीओ कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, त्याच्या राहत्या घरी (के.डी.सी. बँक कॉलनी, गडहिंग्लज) झडती सुरू आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, संदीप काशिद, सुधीर पाटील, संगीता गावडे, कृष्णा पाटील, संदीप पोवार यांनी सहभाग घेतला. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी आणि पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले.
नागरिकांना आवाहन:
लाच मागणी संबंधित तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर (मो. नं.९७६४१४०७७७) या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा अथवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.