‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानात सहकार्य करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे जिल्हावासीयांना आवाहन
कोल्हापूर:रेणू पोवार
दि. १९: कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपवू नका, तर जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. “भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया” हे या वर्षीचे ब्रीदवाक्य असून नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हेमलता पालेकर यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत’ जिल्ह्यात ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. ३० जानेवारी (महात्मा गांधी पुण्यतिथी) या ‘कुष्ठरोग निवारण दिना’पासून या अभियानाची सुरुवात होणार असून, १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हे पंधरवाडा अभियान सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषद, आरोग्य तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील अतिजोखमीच्या ५८७ ठिकाणांवरील ३५ हजार लोकसंख्येचे १०० टक्के सर्वेक्षण पुर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याठिकाणी स्थलांतरीत होणारी लोकसंख्या विचारात घेऊन गावांमध्ये अगोदरच आवश्यक संदेश द्या असेही सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.