बालकांचे संरक्षण, हक्क व कायदेविषयक सेवा विषयावर जनजागृती जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विधी साक्षरता कार्यक्रम
रत्नागिरी,सचिन पाटोळे
दि. २३ :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दि न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांचे संरक्षण, त्यांचे हक्क व कायदेविषयक सेवा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, अॕड. मधुमती कदम, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका राजश्री गारे तसेच स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष दिवाकर सखाराम आडवीरकर उपस्थित होते. सचिव श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मुलांचे हक्क व अधिकार सोप्या भाषेत स्पष्ट केले.
शिक्षणाचा अधिकार, गरजू मुलांना मदत कशी करावी, गरजू मुलांचे हक्क व संरक्षण, महिलांचे हक्क व अधिकार तसेच मतदानाचे महत्त्व याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि DAWAN योजनेबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. अॕड. कदम यांनी विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधत घटनेचे अधिकार, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो) याबाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच राष्ट्रीय विधी सेवा समिती म्हणजे काय, तिच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना 'गुड टच' आणि 'बॅड टच' यातील फरक समजावून सांगत स्वतःच्या सुरक्षितेबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.