सांगली: अय्यान पटेल
दि.८:बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता ही समिती कार्यरत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, पोलीस उपाधिक्षक तथा समितीचे सदस्य सचिव प्रभाकर मोरे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यात ग्रामीण भागात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवावी. बोगस वैद्यकीय व्यावयासिकांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच, याबाबत विविध माध्यमातून जनप्रबोधन करावे, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्ह्यातील अवैधरीत्या सुरू असलेल्या सर्व लॅबोरेटरी चालकांवर कारवाई करण्यासाठी सर्वेक्षण करावे. जिल्ह्यात अवैधरित्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधोपचार करणाऱ्या बोगस व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच, अनधिकृत डेंटल लॅब चालविणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, याबाबत सूचित करण्यात आले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी बैठकीत उपस्थित विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने वैद्यकीय कायद्याच्या परिभाषेच्या अनुषंगाने मत मांडले. प्रारंभी प्रभाकर मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.