शहिदी समागमाच्या ३५० व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारीला होणार कार्यक्रम

सांगली: अय्यान पटेल

दि. १०: शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्यांना अभिवादन करत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

            राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या कार्यक्रमानिमित्त एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे. त्यामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभरामध्ये हिंद की चादर हा कार्यक्रम केला जात आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा संदेश तळागाळापर्यन्त पोहोचवावा, या उद्देशाने महाराष्ट्रामध्येही नांदेड, नवी मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंद दी चादर कार्यक्रम होत आहे.  श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. धर्मांतरसक्तीला शरण न जाता त्यांनी जीवन दान केले. गुरु तेग बहादूर यांनी अनंतपूरसाहेब सारखे पवित्र तीर्थस्थळ निर्माण केले. त्यांची एकच शिकवण होती की राष्ट्र मोठे आहे आणि प्रत्येकाने आपले कर्तव्य करताना शांतीचा संदेश दिला पाहिजे. हा संदेश त्यांनी जगभरामध्ये पोहोचवला, असे सांगून त्यांनी गुरु तेग बहादूर साहेब यांना अभिवादन केले.अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी म्हणाले, गुरू तेग बहादूर हे शिख समाजाचे नववे धर्मगुरू आहेत. त्यांनी मानव अधिकार सुरक्षेचे कार्य केले. ते फक्त शिख समाजाचे गुरू नसून वेगवेगळ्या समाजाना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले होते. हिंद की चादर गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनामार्फतही यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गुरु तेग बहादूर यांचे महाराष्ट्राशी असलेले अतूट नाते या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी पुढे येऊन मनापासून या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी दिलेल्या  योगदानाचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.