मिरजच्या ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

सांगली: अय्यान पटेल

दि.१९: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली व ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले.

            यावेळी हेल्पलाइन नंबर 15100 वर संपर्क साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत देण्यात येणारा मोफत सल्ला, विधी सेवा याबाबत घरबसल्या विधिज्ञांमार्फत मोफत सल्ला घेवू शकतो. याची माहिती आपण आपल्या घरी द्यावी, असे आवाहन उपस्थित विद्यार्थिनींना करून सचिव गि. ग. कांबळे म्हणाले, मोटार वाहन कायदे अंतर्गत बालकांनी आपले वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मोटार परवाना घेवूनच मोटार चालवावी. पालकांनी लहान मुलांना विना परवाना मोटार चालवण्यास देवू नये अन्यथा वाहन मालक यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होवून आर्थिक नुकसान होते, याबाबत त्यांनी यावेळी संबोधित केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच नशेच्या आहारी गेल्याने आयुष्य कसे उद्ध्वस्त होते याविषयीची माहितीही त्यांनी सांगितली.

            बाल विवाह प्रतिबंधक कायदा (Child Marriage Act) याबद्दल माहिती देताना विधी विद्यार्थी श्रीमती नम्रता देशमुख म्हणाल्या, बालविवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, मानसिक विकास आणि स्वावलंबन यावर विपरीत परिणाम होतो. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहणे गरजेचे आहे. पालक, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षक व युवकांनी पुढाकार घेऊन अशा घटनांना प्रतिबंध घालावा व बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस प्रशासन, बाल संरक्षण अधिकारी किंवा 1098 या हेल्पलाईन नंबर ला संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.या शिबिरात ज्योती शिंदे यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा तर प्रतिक्षा साबळे यांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO ACT) याबद्दल मुलींना सुलभ भाषेमध्ये माहिती दिली.

            कार्यक्रमापूर्वी ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज ते लक्ष्मी मार्केट – पोलिस स्टेशन मिरज या मार्गे कायदेविषयक दिंडी काढून ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा, मिरज येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व, वाहतूक कायदा, पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, नशामुक्त भारत, सायबर काईम, भ्रष्टाचार निर्मूलन, ज्येष्ठ नागरिक कायदे, महिलांचे कायदे व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा याविषयी जनजागृतीपर मोठमोठ्या आवाजात घोषणा देऊन तसेच विविध फलक हातामध्ये घेवून जनजागृती केली. प्रास्ताविक व स्वागत ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा मिरजच्या प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी केले.