निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा :- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल 

दि. २३  : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांत, निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक -2026 च्या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवडणूक निरीक्षक स्नेहल भोसले पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सतीश कदम यांच्यासह विविध नोडल अधिकारी प्रत्यक्ष तर क्षेत्रीय अधिकारी दृरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे संबंधित सर्व यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, यासाठी क्षेत्रीय स्तरावर एफ. एस. टी, एस. एस. टी आणि व्ही. एस. टी, अशा विविध पथकांच्या माध्यमांतून कडक तपासणी करावी. त्याच्या योग्य त्या नोंदी घ्याव्यात. आचारसंहिता कक्षाने प्राप्त तक्रारींवर वेळेत कार्यवाही करावी. खर्च तपासणी पथकांनी उमेदवारांच्या खर्चाची नोंद घ्यावी. सार्वजनिक ठिकाणच्या जाहिराती काढल्या किंवा झाकल्या गेल्या असल्याची खात्री करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

            जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रसारित करावयाच्या प्रचारार्थ जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, पेड न्यूज आदिंबाबत आवश्यक कार्यवाही करावी. सोशल मीडियावर बारकाईने देखरेख ठेवावी. पाम्प्लेटस्‌वर मुद्रणालय, प्रकाशक, प्रतींची संख्या नमूद आहे का, याची तपासणी करावी. प्रचार कालावधी संपल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे नमूद करून त्यांनी या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेऊन ग्रामस्तरावर जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर किमान आश्वासित सुविधा पुरवाव्यात, असे स्पष्ट केले.

            पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांनी आवश्यक ते नियोजन चोख करावे. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. मतदान व मतमोजणीदिवशी पुरेसा बंदोबस्त ठेवावा. शस्त्रे जमा करून घ्यावीत. संवेदनशील मतदान केंद्रे असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे आवश्यक ते नियोजन करावे. स्ट्राँग रूम परिसरात चोख बंदोबस्त ठेवावा. राज्य सीमेवर कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक होणार नाही, यासाठी सतर्क राहावे. मतदारांना कोणत्याही प्रकारची प्रलोभने दिली जाणार नाहीत, यासाठी तपासणी मोहीम घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.