जन्म-मृत्यू नोंदी विहीत वेळेत करा; विलंब झाल्यास कारवाई

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या जिल्हास्तरीय बैठकीत सूचना

 कोल्हापूर,: रेणू पोवार 

दि.०३ : शासकीय संस्थांमध्ये जन्म किंवा मृत्यू झाल्यास त्याची नोंद त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या कामात हलगर्जीपणा झाल्यास आणि नोंदी एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, खाजगी रुग्णालयांनीही उशिरा नोंदी केल्यास कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जन्म-मृत्यू नोंदणी आणि जीवन विषयक आकडेवारी संबंधी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले तसेच सर्व गट विकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेला गती देण्याबाबत स्पष्ट सूचना केल्या. ते म्हणाले की, सन २०२५ मध्ये जन्माच्या ७६८ तर मृत्यूच्या ६४७ नोंदी एका वर्षापेक्षा जास्त उशिराने झाल्याची माहिती समोर आली आहे. याची पडताळणी करा. तसेच सन २०१६ पूर्वीच्या ऑफलाईन असलेल्या नोंदी सध्या ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. या कामाला अधिक गती देऊन पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे. ही प्रक्रिया राबवताना कुठेही निष्काळजीपणा होणार नाही याची दक्षता घेऊन मोहीम स्वरूपात हे काम तडीस न्यावे. जन्म नोंदी या त्या-त्या आस्थापनांवर अवलंबून असतात, परंतु मृत्यूच्या नोंदी थेट नागरिकांशी जोडल्या जातात. त्यामुळे मृत्यू नोंदणी वेळेत होण्यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच, याविषयी कोणतीही माहिती मिळवण्यासाठी ‘१०४ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची आकडेवारी मांडली. जिल्ह्यात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी जिल्हा रुग्णालयापासून ते ग्रामविकास अधिकाऱ्यांपर्यंत एकूण १३३४ निबंधक नियुक्त करण्यात आले आहेत. सन २०२५ मध्ये जन्माच्या ७६८ तर मृत्यूच्या ६४७ नोंदी एका वर्षापेक्षा जास्त उशिराने झाल्या आहेत. तसेच, २०१६ पूर्वीच्या जन्माच्या १७ लाख ३१ हजार ७८० नोंदी आणि मृत्यूच्या ६ लाख ५ हजार ४२ नोंदी ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.