रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे काळाची गरज: मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा

सांगली: अय्यान पटेल

दि.४: भारतामध्ये रस्ते अपघातात प्राण गमावण्याचे प्रमाण हे इतर कोणत्याही अपघाती घटनांपेक्षा सर्वाधिक असून, हे रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी आज येथे केले.

            शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली व जिल्हा पोलीस दल सांगली आयोजित रस्ता सुरक्षा अभियान-2026 अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिकेत साखरे, योगेश पुस्तके, राहुल पोवार, कलाविश्व महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पाटील, प्राध्यापक भाऊसाहेब ननावरे आदि मान्यवर उपस्थित होते.

            विद्यार्थ्यांनी कलेच्या माध्यमातून दिलेल्या रस्ता सुरक्षा संदेशाचे कौतुक करून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा म्हणाले, एका चित्रातून जे सांगता येते, ते हजारो शब्दांतूनही शक्य नसते. स्पर्धकांनी रेखाटलेल्या चित्रांमधून सीटबेल्टचा वापर, हेल्मेटची गरज आणि वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा अभियान केवळ एका महिन्यापुरते मर्यादित न राहता, आपण ते वर्षभर अमलात आणले पाहिजेभारताकडे मोठी तरुण लोकसंख्या ही ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ म्हणून ओळखली जाते, मात्र रस्ते अपघातात याच तरुण वर्गाचा बळी जाणे हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून बदलाला सुरुवात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

            मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा म्हणाले, प्रशासकीय दंडाच्या भीतीपेक्षा जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांना हेल्मेट किंवा सीटबेल्ट वापरण्याची आठवण करून देतात, तेव्हा ते अधिक प्रभावी ठरते. आम्ही अनेकदा अपघात स्थळी जातो तेव्हा असे वाटते की, जर या व्यक्तीने हेल्मेट घातले असते तर आज त्याचे प्राण वाचले असते आणि त्याचे कुटुंब उध्वस्त झाले नसते, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना नियमांचे गांभीर्य पटवून दिले. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस म्हणून हेल्मेट देण्यात आले असून, त्याचा प्रत्यक्ष प्रवासात वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्पर्धकांचे अभिनंदन करून स्पर्धकांच्या कलेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा हेतू विशद करून रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती होण्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

            पोस्टर स्पर्धेत प्रथक क्रमांक संकेत मिस्त्री, व्दितीय शितल मोरे, व तृतीय क्रमांक पूजा सुतार यांना मिळाला. तर उत्तेजनार्थ बक्षीस वैष्णवी सुतार व नेहा जगताप यांना देण्यात आले. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात आले. तर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक सृष्टी अडसुळ, व्दितीय सोहम गेतगे, तृतीय क्रमांक प्रगती कोळेकर यांना देण्यात आला. तर उत्तेजनार्थ मानसी नगरकर व वैष्णवी कोळेकर या सर्वांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक रूचा साळुंखे यांनी केले. आभार  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिकेत साखरे यांनी मानले. कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, कलाविश्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.