डिजीटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे गरज : जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा

 सांगली:अय्यान पटेल

दि. १०:वाढत्या इंटरनेट वापराच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) पार्श्वभूमिवर प्रत्येकाने स्वतःच्या डिजीटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे ही गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुरक्षित इंटरनेट दिवस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सेफर इंटरनेट डे (Safer Internet Day) हा जगभर साजरा केला जातो. यावर्षी स्मार्ट टेक, सेफ चॉईसेस – एक्स्प्लोरिंग द सेफ अँड रिस्पॉन्सिबल युज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (“Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of Artificial Intelligence (AI))” ही संकल्पना होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सुरक्षित इंटरनेट दिवसच्या अनुषंगाने सायबर सुरक्षा कशा पद्धतीने करावी, इंटरनेट कशा पद्धतीने हाताळावे, या अनुषंगाने मार्गदर्शन केले.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर शाखेचे कर्मचारी व जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांनी सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. व्याख्यानादरम्यान सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून होणारी ऑनलाईन फसवणूक, इंटरनेट वापरातील सुरक्षितता तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर याबाबत यावेळी उहापोह करण्यात आला. तसेच, इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, सोशल मीडिया वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, ओटीपी व पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व, सायबर गुन्हे, फिशिंग हल्ले, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन तसेच डिजिटल स्वच्छता (Digital Hygiene) या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  या कार्यशाळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी, अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय आष्टा यांचे विद्यार्थी, एआयडीएस शाखेचे विद्यार्थी तथा प्राध्यापक उपस्थित होते.