नवी दिल्ली: प्रतिनिधी
दि.१६: आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी या तंत्राच्या केवळ ‘वापरकर्त्या’ म्हणून न राहता संशोधक आणि निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचे नेतृत्व करावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होउ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला.
दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये दुपारी राष्ट्रीय महिला आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (युनिटार) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय’ आणि आर्थिक शक्ती – महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या विषयावर आयोजित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय भाषणात त्या बोलत होत्या. मंचावर युनिटारच्या संचालिका (समृद्धी विभाग) मिहोको कुमामोटो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (आयटीयू) प्रादेशिक संचालिका (आशिया-पॅसिफिक) अत्सुको ओकुदा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि संगीतकार निर्माता कार्तिक शाह उपस्थित होते.यासमिटमधील चर्चासत्र हा केवळ संवाद नसून ती एक चळवळ आहे. भारतीय महिलांनी नेहमीच परिवर्तनाचे नेतृत्व केले आहे, असा दाखला देऊन श्रीमती रहाटकर म्हणाल्या, ‘एआय’ सारख्या नव्या तंत्रज्ञानातही महिला मागे राहणार नाहीत. त्यासाठी त्यांना योग्य प्रक्षिशण व आवश्यक इको स्टिटीम दिली जाईल. महिलांची केवळ भागीदारी अपेक्षित नसून त्यांच्याकडे या तंत्राची मालकी आली पाहिजे. त्यासाठी महिलांना ‘एआय साक्षर’ होणे अत्यावश्यक आहे. यामध्ये डेटा संरक्षण, डिजिटल नीतिमत्ता आणि सायबर सुरक्षेची सखोल समज आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ घोषणांऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत सूक्ष्म व लघुउद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याचे आवाहन करुन राष्ट्रीय महिला आयोग त्यासाठी कृतीशील प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी दिला.