भरदुपारी देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरी; सराईत महिला अटकेत

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.२५:शहरात भरदुपारी उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून थेट देवघरातील चांदीच्या मूर्ती लंपास करणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून मानसी लक्ष्मीकांत खरे (वय ५०, रा. साने गुरुजी वसाहत) हिला अटक केली असून तिच्याकडून सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी १ ते ४ या वेळेत नागरिक विश्रांती घेत असताना आरोपी महिला दबक्या पावलांनी उघड्या दरवाजातून घरात शिरत असे. घरात प्रवेश केल्यानंतर ती थेट देवघर गाठून चांदीच्या मूर्ती, निरंजन व पूजेचे साहित्य चोरून पळ काढत असे. या पद्धतीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.२३ डिसेंबर २०२५ रोजी शुक्रवार पेठेत पहिली घटना उघडकीस आली. उदय देवरूखकर यांच्या घरातून सुमारे १.८५ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यानंतर उत्तरेश्वर पेठेतही अशाच प्रकारे देवघरातील चांदीच्या वस्तू लंपास करण्यात आल्या होत्या.घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयित हालचालींच्या आधारे २१ फेब्रुवारी रोजी गुन्हे शोध पथकाने कारवाई करत मानसी खरे हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने तीन गुन्ह्यांची कबुली दिली.तिच्या घरातून ४ लक्ष्मीच्या, ३ गणपतीच्या, १ कृष्ण, १ मारुती, १ दत्त, १ साईबाबा, १ स्वामी समर्थ, १ अन्नपूर्णा अशा एकूण १४ चांदीच्या मूर्तींसह निरंजन, टाके, करंडा, पैंजण व दिवा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू असून नागरिकांनी दुपारच्या वेळी घराचे दरवाजे सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.