इचलकरंजीतून ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी २५० भाविक रवाना

इचलकरंजी :हबीब शेख दर्जी 

दि .२ मार्च २६ :   श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे भव्य ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील सुमारे २५० शिख, सिंधी व सिकलगार समाजातील भाविक शनिवारी सकाळी चार लक्झरी बसमधून नवी मुंबईकडे रवाना झाले.
नवी मुंबई येथील खारघरमध्ये शनिवार दि. २८ फेब्रुवारी व रविवार दि. १ मार्च रोजी हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध भक्तिगीते, सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.शासनाच्या निर्देशानुसार मागील पंधरा दिवसांपासून इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग व्हावा यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी शिख, सिंधी तसेच सिकलगार समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली होती.
शनिवारी सकाळी बस रवाना होताना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या प्रतिमेचे पूजन आयुक्त पल्लवी पाटील व उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच समागमासाठी जाणाऱ्या सर्व समाजबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिख समाजाचे दिलप्रीत सिंग, सौ. व श्री सुरींदर मंगलानी, माजी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, सहाय्यक आयुक्त नितिन बनगे, संजय कांबळे यांच्यासह शिख, सिंधी, सिकलगार समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या समागमामुळे शहरात धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले आहे.