कोल्हापूर : रेणू पोवार
माजी खासदार व भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर दोन साखर कारखान्यां मध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर सोमय्या आज मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हातील मुरगूड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत हसन मुश्रीफ, त्यांच्या पत्नी शाहिरा हसन मुश्रीफ, नाविद मुश्रीफ, आबीद मुश्रीफ यांच्यासह विविध कंपन्यांचे संचालक, बेहिशेबी मालमत्ता गुंतवणूक करणारे चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया, महेश गुरव यांची नावं आहेत. या सर्वांच्या विरोधात 120, 420, 468, 471 आणइ 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा असं म्हटलं आहे.
पोलिसांनी सात दिवसांच्या आत एफआयआर रजिस्टर केला नाही तर आपण वरच्या कोर्टात जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांनी हसन मुश्रीफ आणि कुटुंबावर कारवाई करावी अशी मागणी केल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.