इचलकरंजी :विजय मकोटे
यंत्रमागासाठीच्या वीज बिल सवलतीसाठी सुरु असलेल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया संदर्भात येत्या गुरुवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक घेऊन त्याला स्थगिती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांच्या अतिरिक्त सवलतीची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज चालू बिलासह मागील थकबाकी 30 टक्के भरुन व उर्वरीत रक्कम समान हप्त्यात भरण्यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या आहेत. एकूणच आमदार आवाडे यांच्या पुढाकाराने वस्त्रोद्योगाला भेडसावणारे महत्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागून यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करणार्या वस्त्रोद्योगाला नवसंजिवनी मिळण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सध्या वस्त्रोद्योगाला विशेषत: यंत्रमाग व्यवसायाला मदतीची गरज असून राज्य शासनाने तातडीने जाहीर घोषणांची अंमलबजावणी करावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यंत्रमागाच्या थकीत वीज बिलासाठी प्रथमत: 30 टक्के रक्कम भरुन उर्वरीत रकमेसाठी समान हप्ते करुन देण्यात आले. परंतु मार्चमध्ये त्याची मुदत संपल्याने वीज बिलाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला होता. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आमदार आवाडे यांनी वस्त्रोद्योगाची सद्यस्थिती व कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती याची विस्तृत माहित देत ही सवलत सुरु ठेवण्याची मागणी केली. त्यावर मंत्री राऊत यांनी सुधारणा करत चालू बिलासह मागील थकबाकी 30 टक्के भरुन उर्वरीत समान हप्ते करण्यासंदर्भात सूचना करत या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगितले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सन 2019 मध्ये 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाच्या विज बिलात अतिरिक्त 75 पैशांची सवलत देण्याची घोषणा करत त्याची राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. परंतु तांत्रिक कारणास्तव आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या संदर्भात आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी वीज बिल अतिरिक्त सवलत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केली. या संदर्भात नेमकी काय अडचण आहे याची माहिती घेऊन अतिरिक्त सवलतीसह सबसिडीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
विज बिलात सवलतीसाठी राज्यातील सर्वच 27 अश्वशक्तीवरील व त्या खालील लघुदाब यंत्रमागधारकांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणीची जी अट आहे ती रद्द करण्यात यावी, यासंदर्भात शिष्टमंडळाने वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची भेट घेतली. यावेळी आमदार आवाडे यांनी यामधील अडचणीबाबत सविस्तरपणे खुलासा करत ही अट रद्द करावी असे सांगितले. त्यावर मंत्री अस्लम शेख यांनी, या प्रश्नी गुरुवारी आमदार आवाडे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या वीज बिल सवलतीसाठीच्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रक्रियेला स्थगिती देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईला असे स्पष्ट केले. शिष्टमंडळात इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी, संचालक चंद्रकांत पाटील आणि नारायण दुरुगडे आदींचा समावेश होता.