कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेची ५९वी वार्षिक

सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न

 

 

इचलकरंजी ता. : विजय मकोटे

येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २८.०९.२०२१ इ. रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून बँकेच्या स्टेशन रोड, इचलकरंजी या नुतन वास्तूमध्ये उत्साहात संपन्न झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते. या प्रसंगी सभासदांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही नेहमी बँकेच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न होत असते. परंतु, गत दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आजची ही सभा सुध्दा व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे ऑनलाईन पध्दतीने होत आहे. या सभेकरिता बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या ४४ शाखांमधून सभासद उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व सभासदांना धन्यवाद दिले.

कोरोनासारख्या प्राणघातक विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण जगात तसेच आपल्या देशात गत दोन वर्षापासून खळबळ माजली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तसेच अपेक्षापेक्षा जास्त पडलेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होवून, आर्थिक विकासात अनेक अडचणी निर्माण झाल्या. याचा विपरीत परिणाम प्रत्येक उद्योग व्यवसाय क्षेत्रावर अलिकडच्या काळात मोठया प्रमाणात झालेला आहे. तथापि, मला खात्री वाटते की, इंजिनिअरींग आणि इतर अनेकविविध क्षेत्रातील उद्योग व्यवसाय अपेक्षित गती घेत असल्यामुळे, सध्याच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. आर्थिक व्यवस्था सक्षम झाली की बँकेचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये निश्चितच सुयश लाभेल याची मला खात्री व विश्वास आहे. गत वर्षी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग-व्यवसायांच्या कर्जासाठी रिझर्व्ह बँकेने सहा महिन्याचा मोरॅटोरियमचा कालावधी दिला. तसेच कर्जाची पुनबांधणी करणेसाठी सवलत जाहीर केली. आमच्या बँकेने, बँकेच्या कर्जदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून, गत आर्थिक वर्षात साधारण रु. ६५ कोटी कर्ज खात्यांची पुनबांधणी करुन, सभासदांना त्यांचे उद्योग-व्यवसाय सुस्थितीत ठेवणेसाठी मदत केली याचा मला खूप अभिमान वाटतो. याशिवाय खेळत्या भांडवलासाठी २०% अतिरिक्त वकींग कॅपिटल टर्म लोन देवून उद्योगांची पुनर्बाधणी करुन पुढील वाटचालीसाठी मोठया प्रमाणात अर्थसहाय्य केले. मोरॅटोरियम पिरियडमधील व्याजावरील व्याजाचा परतावा खातेदारांच्या खात्यात जमा दिलेला आहे. एकंदरीत परिस्थिती पहाता, भविष्यात सर्वच क्षेत्रात तेजीचे दिवस येत आहेत.

बँकेच्या माध्यमातून इचलकरंजी शहराच्या, विशेषतः, वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये आधुनिकता आणणेसाठी, डीकेटीई संस्थेच्या माध्यमातून, शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, गेल्या १५ ते २० वर्षामध्ये साधे पॉवरलुम्सचे सेमी ॲटोलुम्स आणि अँटोलुम्सचे एअरजेट लुम्स अशा प्रकारे वस्त्रोद्योगामध्ये विविधतेचा अंगिकार करुन, वस्त्रोद्योग आधुकतेकडे घेवून जाण्यासाठी, खऱ्या अर्थाने पाठबळ दिले ते केवळ आणि केवळ आमच्या बँकेनेच हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. यामुळे इतर क्षेत्राबरोबरच वस्त्रोद्योग क्षेत्र हे आधुनिकतेच्या दृष्टीकोनातून जागतिक आणि देशपातळीवर अग्रक्रमी आहे. आमच्या बँकेमुळे वस्त्रोद्योगाचा पाया भक्कम झालेला आहे हे नमूद करताना मला अभिमान वाटतो.

बँकेच्या प्रगतीमध्ये गत आर्थिक वर्षापेक्षा या वर्षी चांगली प्रगती झाली आहे. स्वभांडवल, ठेवी, कर्जे, स्वनिधी या सर्व बाबींमध्ये चांगली वाढ होवून बँकेचा एकूण व्यवसाय रु. ३८०० कोटीचा झाला आहे. ढोबळ नफा साधारण रु. ३६ कोटी झालेला आहे. निव्वळ नफा रु. ११.४२ कोटी इतका आहे. सभासदांना या वर्षी रिझर्व्ह बँकेच्या पुर्वपरवानगीने लाभांश वाटपासाठीचा निर्णय घेतलेला आहे.

बँकेच्या या प्रगतीमध्ये सहकारमहर्षी आणि बँकेचे संस्थापक चेअरमन आदरणीय मा. श्री कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्यामुळे बँकेची प्रगतीमय वाटचाल द्रुतगतीने चालू आहे. बँकेच्या या विकासामध्ये बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वांच्या सहकार्याने बँकेच्या प्रगतीची घोडदौड भविष्यात प्रगतीमय व नेत्रदीपक राहील यात मला तिळमात्र शंका नाही.

सभेचे स्वागतपर भाषण व नोटीस वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत यांनी केले व विषय पत्रिकेतील विषयांना ऑनलाईन मंजूरी देणेबाबत सूचना व विनंती केली आहे.

बँकेचे व्हा. चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचे व सभासदांचे आभार मानले. ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडल्यामुळे एनएसडीएल व बँकेच्या सर्व अधिकारी व सेवकांचेही त्यांनी आभार मानले.

सदर सभेस संस्थापक चेअरमन श्री कल्लाप्पाण्णा आवाडेदादा, बँकेचे माजी चेअरमन डॉ. अशोक सौंदत्तीकर, भूपाल कागवाडे, दऱ्याप्पाण्णा कोरे, सौ. किशोरीताई आवाडे, सौ. वैशाली आवाडे, उत्तम आवाडे, राहुल आवाडे, बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, राजेश पाटील, श्रीचंद टेहलानी, सचिन झंवर, बंडोपंत लाड, महेश सातपुते, सुभाष जाधव, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, संचालिका आक्काताई आरगे, प्रेमलता पाटील, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनिल पाटील, व्हा. चेअरमन एम्. के. कांबळे, मचंट बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, सतीश कोष्टी, अॅड.राम मुदगल, जयप्रकाश शाळगांवकर, बँकेचे जनरल मॅनेजर संजय सातपुते, संजय शिरगावे, अनेक पदाधिकारी, सेवक वृंद, इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी व अनेक मान्यवर या सभेस उपस्थित होते.