लांजा, दि.२६: नासिर मुजावर
तालुक्यातील भरारी प्रतिष्ठानने आयोजित केलेली बाप्पा माझा मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सदर स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष होते. अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली छायाचित्राची कला दाखवून आवड जोपासली.
सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच नाविन्य पूर्ण उपक्रम राबवणाऱ्या भरारी प्रतिष्ठानने यावर्षी बाप्पा माझा मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेचे १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत आयोजन केले होते. सदर स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष होते.
गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे घरीच राहून गणेशोत्सव आनंदात साजरा करण्याचे आवाहन भरारी प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद देत अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. कोल्हापूर, रत्नागिरी,मुंबई इत्यादी भागातुन स्पर्धक सहभागी झाले होते.
सर्व स्पर्धकांनी हुरहुरीने आपल्या बाप्पाचे छायाचित्रे टिपून त्यातून भाव प्रकट करण्याचा प्रयत्न केला. सदर स्पर्धेचे विजेते हे जनतेमधून निवड्यात आले. यामध्ये विजेत ठरलेले स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक रुदाली लाखण, द्वितीय क्रमांक किरण गुरव, तृतीय क्रमांक सिद्धेश तोडकरी तसेच उत्तेजनार्थ म्हणून सूरज गुरव, समीर मांडवकर, विशाल लांबे यांचा सन्मान करण्यात आला. विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना ई-सन्मानपत्र आणि आकर्षक भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ई-सन्मानपत्र देण्यात आले. सर्व स्पर्धकांच्या कलेचा सन्मान भरारी प्रतिष्ठानकडून करण्यात आला.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनमोल यादव, कार्याध्यक्ष ओंकार कोचरेकर, कोषाध्यक्ष असिफ वाडेकर, अजिंक्य गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.