रत्नागिरी :-. मुजीब खान
आपल्या देशात कलाकारांची कमी नाही. एकापेक्षा एक सरस कलाकार आहेत. कुणी तांदळाच्या दाण्यावर नाव कोरतं, तर कुणी वाळूवर दर्जेदार कलाकृती रेखाटतं. यात आणखी एका अवलियाची भर पडली आहे. एखाद्याने वेगवेळ्या झाडांच्या पानाला कोरून त्यापासून अफलातून कलाकृती साकारल्या आहेत. वाचून आश्चर्य वाटलं ना…! रत्नागिरी तालुक्यातील (पानवळ, आपकरेवाडी) येथील केतन बाबल्या आपकरे या कलाकाराने हि किमया करून दाखवली आहे.
केतन आपकरे या तरुण कलाकाराने निसर्गनिर्मित वेगवेगळ्या झाडांच्या पानांना कोरून त्यापासून तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रखुमाई, बाळासाहेब ठाकरे, भगवान शंकर, गणपती , महेंद्रसींग धोनी, कपल्स फोटो, तसेच प्राणी पक्षी अशा अनेक कलाकृती साकारल्या आहेत. तो वेगवेगळ्या झाडांच्या पानांवर कलाकृती साकारतो. तुमचं नाव असुदे किंवा एखादा फोटो अगदी हुबेहूब रेखाटण्याची कला त्याने आत्मसात केली आहे.
आयटीआय सिविल ड्रॉसमन चे शिक्षण घेतलेला केतन लॉकडाऊनच्या काळात नोकरी नसल्यामुळे एकेकाळी जी कला त्याची पॅशन होती ती आज त्याचा पार्टटाइम नोकरी बनली आहे. किरण आपकरे या 24 वर्षीय तरुणाला लहानपणापासून कलेची आवड आहे. मात्र स्वतःच्या कलेच्या माध्यमातून वेगळी कला लोकांच्या निदर्शनात आणली पाहिजे असे वाटायचे. त्याने लहानपणी पानावर एक चित्र पहिले होते. “झाडाच्या पानावर चित्र मी हि काढू शकतो का?” असा प्रश्न त्याने स्वतःच्या मनामध्ये उपस्थित केला. पिंपळ ,फणस, वड, आंबा अशा वेगवेगळ्या झाडांच्या पानावर तो कलाकृती साकारतो. लॉकडाऊन काळात पूर्ण वेळ झाडांच्या पानावर महापुरुषांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न सुरु केला. सुरवातीला डिटेलिन कोरीव काम करताना शेविंग करणाऱ्या ब्लेडच्या साहाय्याने कोरीव काम केले. त्यावेळी केतनला जास्त मेहनत घ्यावी लागत असे. त्यानंतर त्याने या कोरीव कलेविषयी विविध माध्यमातून अधिक माहिती घेतली यातून त्याला ‘पेन नाईट’ ब्लेड वापरले जाते, असे समजले. पेन नाईट ब्लेंडच्या साहाय्याने केतन आज जास्त वेळ मेहनत न घेता कमी वेळात एखादी कलाकृती तयार करतो. त्यामध्ये सिंगल फोटोसाठी अर्धा दिवस मेहनत घ्यावी लागते. तर डबल फोटोसाठी एक किंवा दोन दिवस मेहनत घ्यावी लागते.
लहानपणापासून वेगवेगळ्या कला क्षेत्रात आवड असलेल्या केतन आपकरे या युवा कलाकाराच्या कलाकृतीची दखल घेत गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, चेन्नई, अशा विविध ठिकाणाहून त्याला ऑर्डर मिळू लागल्या आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यनातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत असून त्याचे या कलेविषयी खास कौतुक हि केले जाते. केतनने स्वतःची कला जगासमोर प्रसारित करण्यासाठी इंस्टाग्राम पेज @ketan_apkare_art या नावाने तयार केले आहे.