जवाहर साखर कारखान्याने महाराष्ट्रात सर्वप्रथम कर्मचार्‍यांना दिला बोनस

20 टक्क्याप्रमाणे बोनस सर्वच कामगारांच्या खात्यावर जमा

हुपरी: प्रतिनिधी

संपूर्ण देशात सहकार क्षेत्रात एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केलेल्या हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्रात सर्वप्रथम कर्मचार्‍यांना बोनस दिला आहे. 20 टक्क्याप्रमाणे बोनस सर्वच कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. याबद्दल जवाहर साखर कामगार संघटना (इंटक) यांच्यावतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवडे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
जवाहर साखर कारखान्याने सातत्याने सभासद शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले आहे. प्रत्येकवेळी आवश्यक ते सहकार्य दिले आहे. आगामी दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वात प्रथम कामगारांचा बोनस जमा केला आहे. याबद्दल जवाहर साखर कामगार संघटना (इंटक) यांच्यावतीने आभार मानत कारखान्याचे संचालक आमदार प्रकाश आवाडे, केन कमिटी चेअरमन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना भेटून त्यांचा सत्कार केला.यावेळी संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, उपाध्यक्ष बाळासो सुर्यवंशी, जॉईन सेक्रेटरी महावीर कल्याणी, जॉइन सेक्रेटरी शांतीनाथ चौगुले, खजिनदार रघुनाथ मुधाळे, अविनाश कांबळे, सुरेश पोवार, शंकर पाटील, श्रीकांत करडे, वृषभ ऐतवडे आदी उपस्थित होते.