कोल्हापूर जिल्ह्यातील 30 ऊसतोड कामगारांना सानुग्रह अनुदानाला मंजुरी

कोल्हापूर : प्रतिनिधी 

दि. १४ फेब्रुवारी – लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 30 ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सदरील प्रस्ताव ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत. बैठकीत सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांची सविस्तर माहिती सादर केली. वैक्तिक अपघात, मृत्यू, अपंगत्व, वैद्यकीय खर्च, बैलजोडी मृत्यू व अपंगत्व यांसारख्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कारखानदारांकडून ऊसतोड कामगारांच्या अपघातांची माहिती मागवण्याचे आदेश

जिल्ह्यात आतापर्यंत ३१ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील ३० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, एक प्रस्ताव नैसर्गिक मृत्यूचा असल्याने तो अपात्र ठरवण्यात आला, अशी माहिती सचिन साळे यांनी दिली.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी “जिल्ह्यात अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित असतील, तर त्यांची तात्काळ माहिती संकलित करावी,” असे निर्देश दिले. ते म्हणाले, “पुढील आठ दिवसांत आणखी एक बैठक घेऊन नवीन प्रस्तावांची छाननी करावी. सर्व कारखान्यांना सूचना देऊन ऊसतोड कामगारांच्या अपघात किंवा इतर घटनेबाबत पूर्ण माहिती संकलित करावी. तसेच संबंधित कारखानदारांचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणताही कामगार या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या.”

प्रत्येक ऊसतोडणी मोसमात अपघातग्रस्त कामगारांची माहिती नियमितपणे संकलित करण्याची प्रक्रिया राबवावी, अपघात नोंदणीसाठी नोडल अधिकारी नेमावा, तसेच त्रयस्थ संस्थेच्या मदतीने हे काम हाती घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आरोग्य शिबिर आणि सुरुवातीस आरोग्य तपासणी अनिवार्य

ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक वर्षी कारखाने बंद होण्यापूर्वी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे बंधनकारक राहील. तसेच मोसमाच्या सुरुवातीला सर्व ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक मदत

या योजनेअंतर्गत विविध अपघात आणि नुकसान भरपाईसाठी खालीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाते:

झोपडी व सामग्रीला आग लागल्यास – ₹10,000

अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना – ₹5,00,000

अपघातामुळे अपंगत्व आल्यास – ₹2,50,000

वैद्यकीय उपचार खर्चासाठी – ₹50,000

बैलजोडी मृत्यू (लहान) – ₹75,000

बैलजोडी मृत्यू (मोठी) – ₹1,00,000

राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी आदर्श योजना

कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यात येणारी ही योजना राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राज्यस्तरावर सादर होणाऱ्या प्रस्तावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

#amol yedage # kolhapur news#