इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २६ ऑगस्ट २०२६ : मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदीनुसार व्यावसायिक व मालवाहतूक वाहनांसाठी वैध परवाना (Permit) असणे आवश्यक आहे. मात्र, ऑटो रिक्षासाठी परवानगी/परमिट प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करूनही अद्याप वैध परमिट प्राप्त न केलेल्या वाहनधारकांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी यांच्याकडून संबंधित तब्बल ७३ वाहनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ६६ नुसार परिवहन वाहन सार्वजनिक ठिकाणी चालविण्यासाठी वैध परवाना असणे आवश्यक आहे. संबंधित वाहनधारकांकडे वाहन परवाना धारण करण्यासाठी प्राधिकृत परवानगी क्रमांक उपलब्ध असला, तरी कार्यालयीन अभिलेखांनुसार अद्याप वैध परमिट शुल्क भरून परमिट प्राप्त केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
परमिटशिवाय वाहन चालविणे अथवा परमिटच्या अटींचे उल्लंघन करणे हे कायद्याचे उल्लंघन असून, अशा प्रकरणात मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १९२-अ अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते. नोटिसांमध्ये प्रथम गुन्ह्यासाठी रुपये ५,००० ते १०,००० आणि दुसऱ्या अथवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रुपये १०,००० ते २०,००० पर्यंत दंडाची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नोटीस प्राप्त झालेल्या संबंधित वाहनधारकांनी नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी येथे संपर्क साधून आवश्यक शुल्क भरून वैध परमिट प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विहित मुदतीत परमिट प्राप्त न केल्यास संबंधित वाहनावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नोटिसांद्वारे देण्यात आला आहे.
परिवहन विभागाच्या नियमांचे पालन करूनच ऑटो रिक्षा व्यवसाय करावा तसेच परमिटशिवाय ऑटो रिक्षा चालवू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री श्रीकृष्ण नकाते इचलकरंजी यांनी केले आहे.