‘माधुरी’ हत्तीणीची नांदणीत घरवापसी

कोल्हापूरकरांच्या भक्तीचा 'नाद' की राजकीय श्रेयवादाची खमंग 'फोडणी'?

कोल्हापूरच्या मातीचा स्वाभिमान आणि शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची लाडकी ‘महादेवी’ उर्फ ‘माधुरी’ हत्तीण तब्बल ४०९ दिवसांच्या प्रदीर्घ वनवासानंतर अखेर मठात परतली आहे. गुजरातमधील अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात प्रगत संधिवात आणि पायांच्या आजारावर वर्षभर उपचार घेतल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या हाय-पॉवर कमिटीने (HPC) हिरवा कंदील दाखवताच माधुरीचा हा परतीचा प्रवास सुखाचा झाला आहे. मठाचे प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती श्री १०८ शांतीसागरजी महाराज यांच्या ७१ व्या पुण्यतिथी महोत्सवापूर्वी ‘माधुरी’ मठात दाखल झाल्याने भाविकांचे डोळे पाणावले आहेत. पण, “आमचं ठरलंय!” असं म्हणत एकमेकांना शिंगावर घेणाऱ्या कोल्हापुरी राजकारण्यांनी या पवित्र सोहळ्याला श्रेयवादाची अशी काही खमंग फोडणी दिली आहे, की सध्या जिल्ह्यात राजकीय ‘धुरळा’ उडाला आहे.

गेल्या वर्षी जेव्हा पेटा (PETA) च्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने माधुरीला गुजरातला हलवण्यात आले, तेव्हा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पक्षभेद विसरून रस्त्यावर उतरला होता. जैन समाज, शेतकरी आणि माता-भगिनींनी निरंकार उपवास धरून नांदणी ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेला तो ४५ किलोमीटरचा अभूतपूर्व पायदळ मार्च आणि जनआक्रोशाचा कडकडाट आजही लोकांच्या डोळ्यांसमोर ताजा आहे. परंतु, आता आगामी विविध निवडणुका समोर असल्याने, ज्या जनतेने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा संघर्ष जमिनीवर लढला, त्यांना बाजूला सारून आजी-माजी आमदार-खासदार-स्थानिक नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते “मीच ती आणली!” असं म्हणत छाती ठोकू लागले आहेत.

‘माधुरीला आम्हीच आणले’ हे सिद्ध करण्याची एक अघोषित स्पर्धाच सुरू झाली आहे. सोशल मीडियापासून ते गल्लोगल्ली लागलेल्या बॅनर्सवर आता याच श्रेयवादाचे चित्र पाहायला मिळत आहे.

सर्वात पहिला शड्डू ठोकला तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी. सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांनी “पैशाने तुम्ही साम्राज्य विकत घेऊ शकता, पण जनतेच्या काळजातील निष्ठा आणि नाती कधीच नाही!” असा थेट टोला लगावला. “वेळोवेळी झालेली ती आंदोलने, आमचा न्यायालयीन लढा आणि लोकांचा अथांग पाठपुरावा यामुळेच ही असाध्य गोष्ट साध्य झाली,” असे सांगत शेट्टी यांनी या यशाचे श्रेय थेट जनतेच्या आणि आपल्या आंदोलनाच्या पदरात पाडले. सोशल मीडियावर जो प्रचंड प्रमाणात कमेंट चा महापूर आला आहे, त्यामध्ये सर्वात जास्त कमेंट्स राजू शेट्टी यांच्या बाजूनेच दिसत आहेत. जनताही राजू शेट्टी यांच्यामुळेच हे यश मिळाल्याचे आवर्जून नमूद करत आहे.

दुसरीकडे, सोशल मीडियावर सध्या इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांचे जुने व नवे व्हिडिओ आणि विधाने मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या समर्थकांकडून “आवाडे यांच्या सातत्यपूर्ण शासकीय पाठपुराव्यामुळेच माधुरीची पावले पुन्हा नांदणीकडे वळली,” असा दावा समाजमाध्यमांवर जोरदारपणे केला जात आहे.

त्याच वेळी सत्ताधारी महायुतीचे स्थानिक आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीराख्यांनी “नेत्याचा शब्द, प्रशासनाचा चपराक” अशा आशयाचे बॅनर्स लावत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेल्या शासकीय स्तरावरील समन्वयाचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. “मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सरकारने स्वतः सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला म्हणूनच वाटेतील सगळे काटे दूर झाले; त्यामुळे क्रेडिट तर सरकारचेच,” असा सूर सत्ताधारी गोटातून निघत आहे.

यावर माधुरी साठी कोल्हापूरकरांची स्वाक्षरी असलेले सुमारे २  लाख ४  हजार निवेदन पत्र राष्ट्रपतींना पाठवणारे विरोधी आघाडीचे आमदार सतेज (बंटी) पाटील आणि विरोधी नेते कुठे गप्प बसतात? त्यांनी थेट “जेव्हा माधुरीला इथून ओरबाडून घेऊन गेले, तेव्हा सत्ताधाऱ्यांचे तोंड शिवले होते का? त्यांनी का विरोध केला नाही?” असा बोचरा सवाल करत, “हा विजय कोणत्याही ‘सोंगाड्याचा’ नसून केवळ कोल्हापूरकरांच्या जनआक्रोशाचा आणि एकजुटीचा आहे,” अशी कोल्हापुरी ढंगातली राजकीय फोडणी दिली आहे. श्री दत्त कारखान्याचे संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन आपणही सर्वांच्या बरोबरीने पुढे आहोत हे दाखवून दिले.

मात्र या आजी-माजी नेत्यांच्या ‘खेचाखेचीत’ सामान्य सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मात्र पुरते वैतागले. मुक्या प्राण्याच्या सुटकेवरून राजकारण करणाऱ्या नेत्यांना लोक आता “हा जनतेचा विजय आहे, लगेच कोणी म्हणू नये मी केलं मी केलं…” अशा शब्दांत सोशल मीडियावर चांगलेच सुनावत आहेत. “हा लढा एका मुक्या जीवाच्या हक्कासाठी आणि मठाच्या परंपरेसाठी होता, मतांच्या राजकारणासाठी नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

या राजकीय चिखलफेकीत विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्तेही मागे राहिलेले नाहीत. आम्ही केलेल्या स्वाक्षरी मोहिमा, उपोषणे आणि कायदेशीर पाठपुराव्यामुळेच माधुरी आज नांदणीत उभी आहे, असा दावा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सोशल मीडिया हाताळणारे अनेक युट्यूबर, इन्फ्लुएन्सर, जिओ नंबर पोर्ट करू घेणारे माधुरी प्रेमी यांनीही श्रेयवादात उडी घेतल्याचे दिसते.

वास्तविक पाहता, माधुरीसाठी मठाच्या आवारात सुसज्ज अशा ‘माधुरीवाड्याची’ (पुनर्वसन केंद्र) उभारणी, आधुनिक शॉवर, कुलिंग व्यवस्था, मऊ वाळूचा ट्रॅक आणि स्वतंत्र वैद्यकीय कक्षाची पूर्तता झाल्यानंतरच उच्चस्तरीय संयुक्त समितीने तिला ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. हा विजय नांदणी मठाच्या परंपरेचा, एका मुक्या जिवावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अफाट जनसमुदायाचा आणि कायद्याच्या चौकटीत राहून लढलेल्या न्यायालयीन लढ्याचा आहे याचा विसर पडता कामा नये.

शेवटी, नेत्यांनी श्रेयाचे कितीही ‘राडे’ घातले, तरी माधुरीच्या गळ्यातील घंटीचा नाद नांदणीच्या हवेत घुमतो आहे, हाच सर्वसामान्यांसाठी खरा ‘नाद’ आहे. भक्ती आणि जनभावनेच्या या महापुरात राजकीय पोळी भाजणे कितपत योग्य आहे? माधुरीचे आगमन हे राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे माध्यम बनायला हवे, हेच या निमित्ताने स्पष्ट होते. तसेच नांदणी मठातून माधुरी का गेली? तिला घालवण्यासाठी कोणी प्रयत्न केले? यामागे कोणाची फूस, मदत होती? गैरसमज कोणी पसरवून दिशाभूल केली? यामध्ये अदृश्य हात कोणाचे होते? अशा अर्थपूर्ण वाटाघाटी आणि घडामोडी बाबतही सर्वांनीच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

राजकारण्यांनी श्रेयवादाची ही कुस्ती आता थांबवून, मठात आलेल्या माधुरीची प्राणी संरक्षण कायद्यानुसार योग्य काळजी कशी घेतली जाईल, याकडे लक्ष देणे अधिक आवश्यक आहे.

लेखन : संजय आप्पासाहेब सुतार, नांदणी, मो. ८६००८५७२०७