सांगली, : मयुरी देशपांडे
दि.१८ : युवकांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला व नेतृत्त्व क्षमतेला वाव देण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव व विभागस्तरीय युवा महोत्सवात जास्तीत जास्त युवकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी आज केले.जिल्हास्तरीय युवा महोत्सव दि.२३ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर विभागस्तरीय युवा महोत्सव दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात अपर जिल्हाधिकारी श्री. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, माय भारत सांगली चे उपसंचालक राहुल डोंगरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने, भारत स्काऊट ॲण्ड गाइडचे कैलास कापवार,अंबाबाई तालीम संस्थेच्या प्राचार्य सुजाता पाटील, नाट्यकर्मी राजेंद्र पोळ, प्रदीप चौगुले आदि उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर म्हणाले, युवा महोत्सवाचे आयोजन नियोजनबद्ध व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी. स्पर्धांसाठी तज्ज्ञ परीक्षकांची नियुक्ती तसेच आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करावी. आयोजन करताना विहित पद्धतीचा अवलंब करून सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विजेते विभागस्तरीय स्पधेसाठी पात्र ठरतील व विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचे विजेते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. विभागस्तरावरील स्पर्धेसाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. विजयी संघ व स्पर्धकांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी दरवर्षी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय द्वारे राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ पाठविण्यात येणार असून यासाठी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर या क्रमाने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रमुख ट्रॅक्स (Tracks) अंतर्गत स्पर्धांचे आयोजन
सांस्कृतिक ट्रॅक – “नशा मुक्त युवा, विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित समूह, लोकनृत्य समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन या 5 स्पर्धा आयोजित केल्या जातील.
विकसित भारत चॅलेंज ट्रॅक – यात डिजिटल क्विझ, निबंध स्पर्धा आणि पीपीटी सादरीकरणाद्वारे देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना युवक मांडतील.
इनोव्हेशन ट्रॅक – डिझाईन फॉर भारत : देशासमोरील आव्हानांवर डिझाईन आधारित उपाय शोधणे.
हॅक फॉर सोशल कॉज : सामाजिक समस्यांवर डिजिटल व तंत्रज्ञानविषयक उपाय शोधणे.
युथ आंत्रप्रेन्युअर्स चॅलेंज : तरुण व्यावसायिकांसाठी स्टार्टअप आणि बिझनेस प्लॅन सादर करण्याची नवीन संधी,
युवा संसद (Youth Parliament): युवकांना नेतृत्वगुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हा ट्रॅक यंदा मुख्य महोत्सवाशी जोडला आहे. तसेच स्पर्धात्मक बाबीमध्ये समुह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, कविता लेखन या बाबींचा समावेश आहे.
विकसित भारत चॅलेंज ट्रॅक यामध्ये डिजिटल क्विझ, निबंध स्पर्धा आणि पीपीटी सादरीकरणाव्दारे युवक देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडतील. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (Viksit Bharat Young Leaders” Dialogue) कडून निवडण्यात आलेल्या 44 स्पर्धकांचे पीपीटी सादरीकरण दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.