कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ६ जून :छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभषेक दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत असून ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य शासनाची वाटचाल सुरु असून शिव विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासनमार्फत यापुढेही अनेक उपक्रम राबविण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.
जिल्हा परिषद आवार शिवमय
‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’उभारणी कार्यक्रमासाठी अधिकारी-कर्मचारी पारंपरिक वेषात आले आल्याने जिल्हा परिषद येथील कागलकर हाऊस परिसर शिवयम झाला होता. उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात शाहीर राजू राऊत यांनी शिवभूपाळी सादर केली तर सागर बगाडे यांच्या चमूने सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवजन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या नाट्यछटा सादर केल्या.
तत्पूर्वी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या डेमो हाऊसचे आणि शिवसृष्टी या गडकिल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.