ध्वजदिन निधी संकलनाचे काम सामाजिक बांधिलकीचे

- जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह

रत्नागिरी : सचिन पाटोळे

दि. ८ डिसेवर:- सैनिकांप्रती आपली बांधिलकी जपत ध्वजदिन संकलन उद्दिष्टापर्यंत मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन नागरिकांनी यास सहकार्य करावे आणि आपली भावना दाखवून द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केले.

ध्वजदिन निधी संकलनाचा आज जिल्ह्यात शुभांरभ करण्यात आला.  त्याप्रसंगी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात वीर माता, वीर पत्नी आणि शौर्यपदक विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला.  या कार्यक्रमात पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात 3 हजार 822 माजी सैनिक असून 3 हजार 91 शहीद पत्नी आहेत.  सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेले उद्दिष्ट 79 टक्के पूर्ण झाले असले तरी यापूढे त्यात सामाजिक वाटा वाढेल आणि 67 लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करुन पुढे जाऊन 1 कोटीचे उद्दिष्ट गाठू असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आरंभी शहीदांचे स्मरण करण्यात आले.  2 मिनींटांचे मौन ठेवून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.  त्यानंतर ध्वजदिन निधी स्टिकर लावून जिल्हाधिकारी सिंह यांनी प्रथम निधी संकलनास आरंभ केला.  कार्यक्रमात उपस्थित अधिकारी माजी सैनिक आणि इतरांनीही येथे निधी संकलनास मदत केली  पोलीस दलास जे उद्दिष्ट प्राप्त होईल त्याच्या 200 टक्के उद्दिष्ट पूर्ण करु असे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

मुदतपूर्व उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या तहसीलदार लांजा यांना प्रथम पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला तसेच इतर विजेत्यांचाही यावेळी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.