तृतीयपंथी म्हटले की, आपल्या लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलतात. आपल्याच समाजातला एक घटक किंवा नैसर्गिकपणे आपल्याहून जरा वेगळे जन्मलेले पण आपल्यासारखे माणूसच असणारे कुणीतरी असा विचार पटकन कुणाच्या मनात येत नाही.तृतीयपंथीयांना जन्मभर हेळसांड सहन करत जगावे लागते. त्यांचे माणुस म्हणून असणारे सर्व अधिकार नाकारले जातात. तृतीयपंथी अर्थात ज्यांना समाज हिजडा, किन्नर वा छक्का म्हणून ओळखतो. त्याच्याबद्दल नेहमीच समाजातील इतर स्तरांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे.
तृतीय वर्गाला जाणून-बुजून वाळीत टाकल्यासारखे लोक वागवतात. शरीरातील बदलामुळे पुरुष असून देखील त्याना स्त्री सारख जगावं लागत. अर्थात तृतीयपंथी बनण्यासाठी त्यांच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही, परंतु समाजातील इतर वर्ग जवळ करत नसल्याने त्यांना निकृष्ट जीवन जगण्यास भाग पडते. काही तृतीयपंथी उच्च शिक्षीत असून देखील केवळ त्यांच्या अशा असण्यामुळे त्यांना कामावर ठेवले जात नाही. परिणामी लोकांपुढे हात पसरवून भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर येते. आपल्या आसपास नेहमीच आपल्याला या वर्गाचे दर्शन होत असते उगाच म्हणून ते कधीही कुणाला त्रास देत नाहीत. (काही अपवादात्मक अनुभव सोडले तर कारण प्रत्येक वर्गामध्ये एक असा घटक असतोच जी संपूर्ण वर्गाचे नाव खराब करतो.) त्यांना पाहिल की बऱ्याच जणांच्या मनात एक किळसवाणी भावना उत्पन्न होते. त्याचप्रमाणे त्यांच्या बद्दल कुतुहलदेखील जागे होते. तृतीयपंथी वर्गाबद्दलच्या जास्त प्रमाणात अफवाच लोकापर्यंत पोहचल्या आहेत. ज्यामुळे या वर्गाची इतर समाजापुढील प्रतिमा मलीन झाली आहे.
या वर्गातील लोकांसमोर वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात अनेक पेचप्रसंग, कायदे विषयक अडचणी उभ्या राहतात. आतापर्यंत प्रशासकीय समित्यांमध्ये नामनिर्देशित उमेदवार म्हणून सहभाग असो किंवा महाविद्यालयातील प्रवेश, नोकरी, उद्योग अशा विविध क्षेत्रात यांना पदोपदी विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र तृतीयपंथीयांच्या समस्या नेमक्या कोणत्या विभागाने सोडविणे? हा नेहमीचाच प्रश्न. आतापर्यंत सरकार-दरबारीसुध्दा याचे निराकरण झाले नव्हते. परंतु शिंदे-फडणवीस शासनाने या वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच आपल्या भाषणात म्हणतात हे सामान्य जनतेचे, गोरगरीबांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. या शासनाने आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय हे जनतेच्या हीतासाठी घेतले आहेत. हे लोकाभिमुख शासन आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास साधने हा या शासनाचा मुख्य उद्देश आहे. तृतीयपंथी हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. समाजातील इतर सर्व घटकांच्या विकासासोबच या घटकाचाही सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने या शासनाने ऐतिहासिक असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
तृतीयपंथ या समाज घटकांची सर्वांगिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी तसेच तृतीयपंथीयांना भेदभावरहित वागणूक देण्यासाठी सर्व शासकीय विभाग आणि सार्वजनिक प्राधिकरणांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज/आवेदनपत्रावर लिंग पर्याय म्हणून “पुरुष” व “स्त्री” घटकाबरोबर “तृतीयपंथी” हा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच तृतीयपंथीय घटकाला नोकरी, शिक्षण क्षेत्रासह सर्व शासकीय योजनांमध्ये जिथे जिथे लिंगाबाबत विचारणा करण्यात येईल तिथे तिथे “पुरुष/स्त्री” या पर्यायासोबत “तृतीयपंथी” हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा. मात्र त्या बाबींसाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने आवश्यक अर्हता विहित करावी किंवा असलेल्या अर्हतेची पूर्तता तृतीयपंथीयांना करावी लागेल.
प्रविण रा. डोंगरदिवे
उपसंपादक
विभागीय माहिती कार्यालय
कोकण विभाग, नवी मुंबई