इचलकरंजी २८ : विजय मकोटे
दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कनोजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर श्रद्धांजली ठराव वाचन संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी अहवाल सालातील यंत्रमाग व्यवसायाच्या अडचणी दुर करणेसाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. अहवाल सालात ३ ते ३० दिवस पेमेंटधारा करणेमध्ये पॉवरलुम असोसिएशनला यश आलेचे नमुद केले. त्याचबरोबर रॅपिअर यंत्रमागधारकांची एकजूट करून मजूरीचे व इतर प्रश्न मार्गी लावणेत इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला यश आलेचे नमूद केले. साध्या मागाचा प्रश्न ऐरणीवर घेऊन साध्या यंत्रमागाचे प्रश्न सोडवीणेसाठी पॉरलुम असोसिएशन प्रयत्नशील राहील असे सांगितले. यानंतर इनचार्ज सेक्रेटरी श्रीकृष्ण जोशी यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय वाचून दाखविले. सभेत सर्व विषय मंजूर करणेत आले.
पॉवरलुम असोसिएशनच्या वार्षीक सर्वसाधारण सभेस उपस्थित असणारे माजी वस्त्रोद्योग मंत्री व विद्यमान आमदार मा.प्रकाशराव आवाडे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी गेल्या दिड वर्षातील कोरोनातील परिस्थितीचा वस्त्रोद्योगावर झालेल्या परिणामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योगाला मदत करण्याची भूमीका या कठीण प्रसंगी घेणे आवश्यक असताना सरकार घेत नाही याबद्दल खेद व्यक्त केला. सरकारने यंत्रमाग उद्योगाला ताकतीने मदत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गेल्या वर्ष दिड वर्षामध्ये केलेल्या घोषणांची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला. २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांना ७५ पैशांची वीज दरातील सवलतीची घोषणा होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच माहे मार्च २०२० च्या बजेटमध्ये ७५ पैसे वीज सवलतीची घोषणा झालेली आहे. घोषणा झालेल्या दिवसापासून अंमलबजावणी करून यंत्रमागधारकांना पूर्वलक्षी प्रभावाने त्यांच्या बँक खात्यावर सरकारने पैसे जमा करावेत अशी मागणी केली. याचबरोबर २७ एच.पी. खालील यंत्रमागधारकांना अतिरिक्त १ रूपयांची सवलत देखील द्यावीच लागेल असे सांगितले. याचबरोबर अजूनही पूरग्रस्त शेतकरी व यंत्रमाग उद्योजकांना कोणतीही मदत मिळालेली नाही. ती लवकरच मिळणे आवश्यक आहे पण ती वेळेत का दिली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. यंत्रमाग उद्योगाच्या प्रश्नामध्ये राजकारण व श्रेयवाद उपस्थित करून गावात जे राजकारण चालू आहे त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांनी प्रश्न त्वरीत सोडवावेत यास माझे पूर्ण सहकार्य राहील असे सांगितले. याचबरोबर इचलकरंजीला आवश्यक असलेली प्रोसेसची कमतरता भरूण काढणेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू होते. त्यास इचलकरंजी पॉवरलुम मेगा क्लस्टरच्या अद्यावत अशा अत्याधुनिक प्रोसेस हाऊसमुळे चालना मिळणार आहे. या अत्याधुनीक प्रोसेस हाऊसचा इचलकरंजीतील साध्या यंत्रमाग उद्योजकासह रॅपिअर व एअरजेट उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. याचबरोबर येत्या ४ ते ५ महिन्यांत इचलकरंजीमध्ये निर्यातीसाठी डी.जी.एफ.टी.चे कार्यालय सुरू करणेचा मानस बोलून दाखवला.
यानंतर संस्थेचे संचालक प्रमोद महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी सुत्रसंचालन केले. यासभेस संस्थेचे संचालक नारायण दुरूगडे, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग पाटील, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, संचालिका श्रीमती हमिदा गोरवाडे, ताराराणी पक्षाचे शहर अध्यक्ष मा.प्रकाश दत्तवाडे, सन्मती बँकेचे चेअरमन मा.सुनिल पाटील, इचलकरंजी जनता बँकेचे संचालक मा.बंडोपंत लाड, यशवंत प्रोसेसचे चेअरमन मा.अहमद मुजावर, सेवक वर्ग व व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सभासद बंधू सहभागी झाले होते.