औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी उभारण्यात येणार्या नवीन सीईटीपी प्रकल्पाच्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून मुंबई येथे बैठक पार

इचलकरंजी : विजय मकोटे
दि .३ : इचलकरंजी शहर, लक्ष्मी आणि पार्वती औद्योगिक वसाहत याठिकाणी उभारण्यात येणार्या नवीन अत्याधुनिक सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पाच्या अनुषंगाने मंगळवारी आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून मुंबई येथे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेलारसु यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. त्यामध्ये प्रकल्पांची उभारणी, त्याचे कामकाज व देखभाल संदर्भात सविस्तर चर्चा झाली. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास प्रदुषणाचा प्रश्‍न संपण्यास मोठी मदत होणार आहे.
पंचगंगा नदीचे प्रदुषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत राज्य शासनाने इचलकरंजी शहर तसेच पार्वती औद्योगिक वसाहत व लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथे तीन अत्याधुनिक सामुहिक सांडपाणी औद्योगिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या निर्णय घेतला आहे. या संदर्भातील५२९ कोटीच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) ३० सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली असून त्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.
कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावांतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्यामुळे पंचगंगा मोठ्या प्रमाणात प्रदुषित होऊन देशातील प्रदुषित दहा नद्यांमध्ये तिचा समावेश झाला. ही पंचगंगा प्रदुषणमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. प्रदुषणमुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत एमआयडीसीकडून ५२९ कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. या तीन अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारणीसाठी सर्वच विभागांकडून तात्विक मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी २५ आणि उद्योग विभागाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
यामध्ये सध्याचा इचलकरंजीतील १२ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प १५ एमएलडीचा, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील 1 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प 5 एमएलडीचा आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत ५ एमएलडी क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्य माध्यमातून उभारण्यात येणारे हे अत्याधुनिक प्रकल्प पूर्ण क्षमतेने आणि त्याची देखभाल या संदर्भात या बैठकीत विशेषत: चर्चा झाली. त्यामध्ये आमदार राहुल आवाडे यांनी सध्याच्या इचलकरंजीतील सीईटीपी प्रकल्प व लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्रकल्पाची माहिती देत ते पूर्ण क्षमतेने चालविले जात असल्याचे सांगत नवीन प्रकल्पही त्याच क्षमतेने चालविले जातील, अशी ग्वाही दिली.
बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे श्री. मोडगिरे, कोल्हापूर मंडळाचे अधिकारी श्री. हजारे, श्री. माने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यासह इचलकरंजीतील प्रोसेस उद्योजक गिरीराज मोहता, अजित डाके, संदीप सागावकर, संदीप मोघे, शहाजहान शिरगांवे, विलास शिसोदे, अनिल कुडचे, तुषार सुलतानपुरे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.