इचलकरंजी.विजय मकोटे
दि .७ :शहरातील समाजवादी पार्टी, आम आदमी पक्ष, लाल निशान पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साने गुरुजी विचार मंच, विकली मार्केट व्यापारी संघटना, जामा सोशल फाउंडेशन, साथी फाउंडेशन, साने गुरुजी समविचारी मंच, श्रमिक संघटना, समाजवादी महिला सभा व श्रमिक महिला मोर्चा या पुरोगामी आणि समविचारी पक्ष व संघटनांच्या वतीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री मदन कारंडे यांना पाठिंबा देण्याचा, त्यांच्या प्रचारामध्ये संपूर्ण शक्तीनिशी सहभागी होण्याचा आणि त्यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचबरोबर गेली 12 वर्षे केवळ राजकारण व श्रेयवाद यामुळे रखडलेला या शहरातील पाणी प्रश्न, यंत्रमाग उद्योग, असंघटित कामगार व मतदारसंघातील सर्व कष्टकरी जनतेचे विविध प्रश्न यांना मदन कारंडे व महाविकास आघाडी निश्चितपणे न्याय देतील असा विश्वासही या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे संरक्षण करणे. या देशाच्या घटनेने देशातील सर्व धर्म, पंथ व जातीच्या सर्व 140 कोटी जनतेला दिलेले समान मूलभूत हक्क, नागरी स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करणे. आणि धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना रोखणे यासाठी पुरोगामी, डाव्या व समाजवादी विचारांच्या सर्व पक्ष व संघटनांनी एकजूटीने या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सर्व ठिकाणी महाविकास आघाडीला साथ दिली पाहिजे अशी भूमिका इचलकरंजी शहरातील विविध पुरोगामी पक्ष व संघटनांच्या बैठकीत एकमताने व्यक्त व जाहीर करण्यात आली आहे.
शहरातील डावे पुरोगामी व समविचारी पक्ष व संघटना यांची बैठक बजरंग लोणारी, समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष जाविद मोमीन यांनी पुढाकार घेऊन आयोजित केली होती. या बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे हे उपस्थित होते. पद्माकर तेलसिंगे, मुकुंद माळी, वसंत कोरवी, प्रकाश सुतार, सुनील बरवाडे, उषा कांबळे, अनिल होगाडे, अशोक चौगुले, जावेद बागवान, दिलावर पटेल, अस्लम शेख, अंजना रेंदाळकर, कांचन उपाध्ये, रणजीत आबाळे, सचिन नेमिस्टे, अश्पाक गवंडी, रियाज मोमीन, सिकंदर मुल्ला, मुन्ना वाळवेकर, शब्बीर तराळ, अलनिसर शेख, जैद गवंडी, इ. प्रमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.