आंबा बागायतदारांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सदैव कटिबध्द- पालकमंत्री उदय सामंत 

 

रत्नागिरी, दि.२८ :- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्या. रत्नागिरी यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, उपसरव्यवस्थापक कृषी पणन मंडळ मिलिंद जोशी, जिल्हा उपनिबंधक डाॕ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीला मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आंबा बागायतदारांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. आंबा बागायतदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा व व्याजामध्ये सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यासंबंधी कार्यवाही करण्यात यावी. बँकांनी सिबील स्कोअर विचारात न घेता आंबा बागायतदारांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे तसेच विविध योजनांचे लाभार्थी बँकेमध्ये येत असतात त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. याबाबत सर्व बँकांना अग्रणी बँकेने निर्देश द्यावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

वानर व माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे पुरविण्यात आले आहेत. आंबा वाहतुकीसाठी सिंधुरत्न योजनेमार्फत सबसिडी देण्यात येणार असून, सप्टेंबर अखेरपर्यंत गाड्या उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिली. सिंधुरत्न योजनेतून शेतकऱ्यांना कमी दरांमध्ये फवारणीसाठी औषधे, खते, अवजारे उपलब्ध करुन दिली जातील. बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा लवकरच रत्नागिरी येथे उभारण्यात येणार असून, त्याकरिता सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. पणन विभागाने शेतकऱ्यांना हापूस जीआय मानांकन घेणे बंधनकारक करावे जेणेकरुन हापूस आंब्यांचा बोगस व्यापार थांबविणे शक्य होईल. भरारी पथकांची नेमणूक करुन कर्नाटक आंबा हापूस आंबा म्हणून विक्री करताना आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.

आज झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात पुन्हा बैठक घेवून आंबा बागायतदारांसाठी कर्जमाफी व व्याजामध्ये सूट मिळण्याकरिता तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी बैठकीच्या वेळी सांगितले.

बैठकीला विविध बँकांचे व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, आंबा बागायतदार उपस्थित होते.