रत्नागिरी, दि. 10 – सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज जिल्हा नियोजन सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिराजदार, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू सावंत, नायब तहसिलदार माधवी कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स -महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17 —जाहिरातीसाठी संपर्क… दिपक तुळसणकर —9730389876).. नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462]
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. सूर्यवंशी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, प्रशासन सदैव सैनिकांच्या पाठीशी उभे आहे, उमेदीच्या वयामध्ये सैनिक कुटूंबापासून दूर राहून आपल्या देशाचे संरक्षण करत असतात. आपण स्वत: सैनिक परिवारातील असल्याने सैनिकांचे खडतर आयुष्य फार जवळून पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. सैनिकांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड सैनिक कल्याण निधीच्या माध्यमातून करुन खारीचा वाटा आपण उचलू शकतो. त्यामुळे सर्वांनी सैनिक कल्याण निधीसाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे यांच्या हस्ते अमर जवान प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. दोन मिनीटे मौन धारण करुन शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रत्यक्ष युध्दामध्ये सहभागी शौर्यपदक विजेते, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता-पिता यांचा सत्कार करण्यात आला. शौर्यपदक धारक नाईक बजरंग मोरे यांचा सत्कार अपर जिल्हाधिकारी श्री.बर्गे यांच्या हस्ते करण्यात आला. शहीद कॅप्टन प्रेमकुमार पाटील यांचे वडील कृष्णा पाटील व आई राधा पाटील यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माजी सैनिक अरुण आठल्ये, शंकर मिल्के, बाळकृष्ण शिंदे व 1971 च्या युध्दामध्ये सहभागी झालेले एकनाथ सकपाळ, चंद्रकात पवार, श्री.कदम, श्री. सातव यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. आपल्या वयाच्या 60 वर्षपूर्ती निमित्त श्रीमती शुभदा साठे यांनी ध्वजदिन निधीसाठी 61 हजार रुपये, वैदेही रायकर यांनी 11 हजार रुपये व जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण बिराजदार यांनी 5 हजार रुपये निधी दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावर्षी जिल्ह्यात 43 लाख 13 हजार 531 रुपये ध्वजदिन निधी संकलित करण्यात आला. सर्वाधिक निधी संकलन करण्याऱ्या कोकण कृषि विद्यापीठ दापोली, तहसिलदार चिपळूण, तहसिलदार रत्नागिरी, तहसिलदार गुहागर, विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ तसेच विविध कार्यालयांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.